मंगळवारी पहाटे चोरांनी लक्ष्य केलेले घर.
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : पालवाडा उसगाव येथे पहाटे घरातील महिलेला बेशुद्ध करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कपाटातील रोख रक्कम घेऊन दोन चोरट्यानी पोबारा केला.
शीतल रामा गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती दररोज मासे आणण्यासाठी घराबाहेर पडतात. नेहमीप्रमाणे ते मडगावला जाण्यासाठी पहाटे निघाले होते. कदाचित चोरांना ते कधी घरातून बाहेर पडतात व परत घरी केव्हा येतात, याची माहिती असावी. म्हणूनच त्यांनी ते निघाल्यानंतर घरात प्रवेश केला. घरात कोणीतरी आले असल्याचा सुगावा लागताच शीतल गावडे सावध झाल्या. मात्र त्या काही करण्यापूर्वीच चोरांनी त्यांना पकडले व बेशुद्ध केले. बेशुद्ध पडल्यानंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कपाटातील रोख रक्कम घेऊन चोर तिथून पसार झाले. शीतल गावडे यांच्या म्हणण्यानुसार मंगळसूत्राची किंमत किमान दीड लाख रुपये असू शकते. कपाटात ६० हजार रुपयांची रोकड होती. चोरांनी त्यावर हात मारला.
घडलेल्या प्रकरणाची उसगाव येथील पोलीस आऊट पोस्टमध्ये त्यांनी माहिती दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरांच्या मुसक्या आवळ्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
जंगलात असलेले घर हेरून चोरीचे प्रकार वाढले
जंगलात वा आसपास घरे नसल्याचे पाहून त्या घरी चोरी करण्याचे प्रकार राज्यात वाढले आहेत. यापूर्वी सत्तरी तालुक्यातही असेच घर हेरून चोरांनी दागिने व रोख रक्कम चोरली होती. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.