जीएसटी कौन्सिलची बैठक : यापुढे ५ टक्के, १८ टक्के दोनच स्लॅब लागू
नवी दिल्ली येथे झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत विषय मांडताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत इतर.
न्यूज डेस्क। गाेवन वार्ता
नवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत १२ टक्के आणि २८ टक्के कर स्लॅब काढून टाकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
कॅसिनो, यॉट, रेस क्लब प्रवेश, तंबाखू उत्पादने, कार्बोनेटेड आणि कॅफिनयुक्त पेये, एरेटेड ड्रिंक्स, विशिष्ट हायब्रिड्स व प्रीमियम गाड्यांवर आता ४० टक्के जीएसटी लागणार आहे. २२ सप्टेंबरपासून फक्त ५ टक्के आणि १८ टक्के, असे दोन स्लॅब लागू केले जातील. यामुळे सुमारे १७५ वस्तू स्वस्त होतील.
ही बैठक ३ आणि ४ सप्टेंबर अशी दोन दिवस होणार होती, मात्र ती एकाच दिवसात संपली. या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तसेच इतर राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वा अर्थमंत्री उपस्थित होते.
बैठकीतील ठळक मुद्दे
कपडे आणि पादत्राणे होणार स्वस्त : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५०० रुपयांपर्यंतचे पादत्राणे आणि कपड्यांवरील जीएसटी दर ५ टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. यामुळे ग्राहकांसाठी या वस्तू स्वस्त होतील.
एमएसएमई आणि स्टार्टअप्ससाठी जलद नोंदणी : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि स्टार्टअप्ससाठी जीएसटी नोंदणीसाठी लागणारा वेळ ३० दिवसांवरून फक्त ३ दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
निर्यातदारांना स्वयंचलित परतावा : निर्यातदारांना आता स्वयंचलितपणे जीएसटी परतावा मिळेल. हा प्रस्तावदेखील मंजूर झाला आहे. यामुळे त्यांचे काम सोपे होईल.
आरोग्य विमा आणि जीवनरक्षक औषधे होणार स्वस्त : जीएसटी कौन्सिलने विमा प्रीमियम दर कमी करण्यास सहमती दर्शविली आहे. यामुळे आरोग्य विमा खरेदी करणे स्वस्त होईल. यासोबतच, जीवनरक्षक औषधांवरील जीएसटी दरदेखील कमी होण्याची अपेक्षा आहे.
स्वयंचलित रिटर्न फाइलिंगचा प्रस्ताव : जीएसटी कौन्सिलने स्वयंचलित रिटर्न फाइलिंग सिस्टम सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे जीएसटीशी संबंधित नियमांचे पालन करणे आणखी सोपे होईल.
लक्झरी इलेक्ट्रिक वाहनांवरील कर वाढणार : २० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या लक्झरी इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी दर ५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. हा प्रस्ताव मंजूर झाला तर टाटा मोटर्स, महिंद्रा, टेस्ला आणि मर्सिडीज-बेंझ सारख्या कंपन्यांसाठी ते आव्हान बनू शकते.
अनेक वस्तूंवरील जीएसटी दरात कपात शक्य
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १७५ वस्तूंवरील जीएसटी दरात कपात केली जाऊ शकते. यामध्ये अन्न घटक, बदाम, स्नॅक्स, तयार पदार्थ, जाम, तूप, लोणी, लोणचे, चटणी, ऑटोमोबाईल्स, ट्रॅक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, एसी आणि रेफ्रिजरेटर इत्यादींचा समावेश आहे.