१६ सप्टेंबर रोजी निवडणूक : ११ रोजी रिंगणातील उमेदवारांची संख्या होणार निश्चित
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा क्रिकेट संघटनेच्या (जीसीए) अध्यक्षपदासाठी चेतन देसाई यांचे बंधू महेश देसाई आणि बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर यांच्यात चुरस होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी आठ अर्ज आले आहेत. त्यात महेश देसाई यांचे दोन अर्ज आहेत. १० सप्टेंबरला अर्जांची छाननी होणार आहे. ११ रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीत किती उमेदवार राहतात, ते स्पष्ट होईल. निवडणूक १६ सप्टेंबर रोजी होणार आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव, खजिनदार व सदस्य पदासाठी एकूण ४६ अर्ज आले आहेत. त्यात काहीजणांनी एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत चेतन देसाई, विनोद फडके, सूरज लोटलीकर असे अनेकजण एकत्र आल्याचा दावा महेश देसाई यांनी केला आहे. हे सर्व दिग्गज आपल्या मागे असल्यामुळे यावेळी आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
अध्यक्षपदासाठी आलेल्या आठ अर्जांमध्ये महेश देसाई, महेश कांदोळकर, अनंत नाईक, परेश फडते, राजेश पाटणेकर, सय्यज माजीद आणि सुदेश राऊत यांच्या अर्जांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदासाठी ६ अर्ज आले आहेज. यात आदित्य आंगले, परेश फडते, राजेश पाटणेकर, अमरेश नाईक, सय्यज माजीद आणि तुळशीदास शेट्ये यांचा समावेश आहे.
सचिवपदासाठी आदित्य चोडणकर, अमरेश नाईक, दया पागी, हेमंत आंगले, महेश कांदोळकर, सय्यद माजीद, तुळशीदास शेट्ये यांचे अर्ज आहेत. संयुक्त सचिव पदासाठी आदित्य चोडणकर, अनंत नाईक, जमीर करोल, मेघनाथ शिरोडकर, परेश फडते, रूपेश नाईक, सैबर मुल्ला, सुशांत नाईक यांचे अर्ज आले आहेत.
खजिनदार पदासाठी दया पागी, जमीर करोल, मेघनाथ शिरोडकर, परेश फडते, रूपेश नाईक, सैबर मुल्ला, सय्यज माजीद, उमेश गावस यांचे अर्ज आहेत, तर सदस्यपदासाठी आदित्य आंगले, महेश बेहकी, मेघनाथ शिरोडकर, उमेश गावस, विकास पार्सेकर यांचे अर्ज आले आहेत.
दोन गट आमनेसामने
या निवडणुकीत सध्या दोन गट आहेत. मात्र हे गट शेवटपर्यंत कायम रहातात की त्यांच्यात समेट होतो, ते ११ सप्टेंबरपर्यंत स्पष्ट होईल. सध्या महेश देसाई यांना चेतन देसाई, सूरज लोटलीकर, अकबर मुल्ला, बाळू फडके यांचा पाठिंबा आहे. महेश कांदोळकर यांना विद्यमान जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांचा पाठिंबा आहे.
महेश देसाई यांचा विजय निश्चित आहे. ८० टक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्क्याने महेश देसाई विजयी होतील.
_ विपूल फडके, विद्यमान अध्यक्ष, जीसीए