गोवेकरांना सहा महिन्यांत मिळणार ३२५ एमएलडी पाणी

पाणीपुरवठामंत्री सुभाष फळदेसाई यांची हमी


04th September, 12:19 am
गोवेकरांना सहा महिन्यांत मिळणार ३२५ एमएलडी पाणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील लोकांना येत्या सहा महिन्यांच्या आत ३२५ एमएलडी पाणी वापरण्यासाठी दिले जाईल. राज्यातील ४० टक्के जनतेला दररोज १८ तास, तर उर्वरित लोकांना १२ तास पाणी देण्याचे लक्ष्य आहे, असे पाणीपुरवठामंत्री सुभाष फळदेसाई यांनी ​सांगितले.
पणजीत खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री फळदेसाई म्हणाले, डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना दिवसाला चार तास पाणी देण्याचा प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी १२ तास पाणी देणे अशक्य आहे, अशा ठिकाणी किमान अर्धा तास तरी पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सध्या ९ टक्के लोकांना चार तासांपेक्षा कमी पाणी मिळते. ४५ टक्के लोकांना आठ तास पाणी मिळते, तर २४ टक्के लोकांना २४ तास पाणी मिळत आहे. येत्या सहा महिन्यांत प्रत्येक घरात १२ तास पाणी देण्याचा प्रयत्न असेल.
पाणी गळतीबाबत सरकार गंभीर !
पाणी गळतीबाबत सरकार गंभीर आहे. काही ठिकाणी मीटरमध्ये दोष असल्याने पाण्याची बिले येत नाहीत. त्याला पाण्याची चोरी म्हणता येणार नाही. नादुरुस्त मीटर लवकर बदलण्यात येतील. काही ठिकाणी चाळीस वर्षांपूर्वीची जलवाहिनी आहे. जुन्या जलवाहिनीतून पाणी गळती होते. ५६० टाक्यांवर वॉटर फ्लो मीटर लावण्यात येईल. यातून पाण्याचा वापर व गळतीचा हिशेब मिळू शकेल. औद्योगिक क्षेत्रात मीटर न वापरता पाणी वापरले जात असेल तर त्यांच्यावर खात्याचे लक्ष राहील, असेही मंत्री फळदेसाई यांनी स्पष्ट केले.