रेल्वे दुपदरीकरण आराखड्याला काँग्रेस सरकारनेच दिली मान्यता

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची टीका


04th September, 12:17 am
रेल्वे दुपदरीकरण आराखड्याला काँग्रेस सरकारनेच दिली मान्यता

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : रेल्वे दुपदरीकरण आराखड्याला काँग्रेस सरकारच्या काळातच मान्यता मिळाली होती. आता जे आंदोलनाचा इशारा देत आहेत, त्यांनी तेव्हा दुपदरीकरणाला विरोध का केला नाही, असा सवाल वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला. रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाला २००८-२००९ मध्ये मंजुरी मिळाली होती, असेही ढवळीकर म्हणाले.
होसपेट ते वास्को मार्गाच्या रेल्वे दुपदरीकरणावरून राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दुपदरीकरण कोळशाच्या वाहतुकीसाठी होत आहे, असा दावा करून काँग्रेसने दुपदरीकरणाला विरोध केला आहे. मंत्री ढवळीकर पुढे म्हणाले, केंद्रात आणि राज्यात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हाच दुपदरीकरणाच्या डीपीआरला मान्यता मिळाली होती. काँग्रेसचे तेव्हा दिगंबर कामत मुख्यमंत्री होते. त्या सरकारमध्ये मी वाहतूकमंत्री होतो. केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. दुपदरीकरण प्रकल्प तेव्हा रद्द करणे शक्य होते. मात्र त्यांनी प्रकल्प रद्द केला नाही. आता जे लोक आंदोलन करत आहेत, त्यांचा कोकण रेल्वेलाही विरोध होता. आज हेच लोक कोकण रेल्वेतून मुंबईपर्यंत प्रवास करत आहेत.
काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आईविषयी चुकीचे उद्गार काढले. आई ही गुरुसमान असते. आईविषयी गैरबोलणे अयोग्य आहे.
_ सुदिन ढवळीकर, वीजमंत्री