सात वर्षांनंतर पती सापडला…रीलवर दुसऱ्या महिलेसोबत!

पत्नीची पोलीस ठाण्यात धाव : पोलिसांकडून पतीचा शोध सुरू

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd September, 08:52 pm
सात वर्षांनंतर पती सापडला…रीलवर दुसऱ्या महिलेसोबत!

हरदोई : इन्स्टाग्राम सध्या प्रत्येकाच्या जीवनाचा घटक बनला आहे. पण उत्तर प्रदेशातील हरदोईतल्या शीलूच्या आयुष्यात याच इन्टाग्राममुळे धक्कादायक वळण आले. सात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला पती जितेंद्र कुमार उर्फ बबलू तिला इन्स्टा रीलमध्ये दिसला आणि तोसुद्धा दुसऱ्या महिलेसोबत. त्यामुळे तिने थेट पोलीस ठाणे गाठले.
शीलूचे लग्न २८ एप्रिल २०१७ रोजी आटमाऊ गावात जितेंद्र कुमारशी झाले होते. पण सासरच्या मंडळींकडून मागितलेली सोन्याची साखळी व अंगठी न मिळाल्याने, जितेंद्रने शीलूला घरातून हाकलून दिले. काही महिन्यांतच शीलूच्या वडिलांनी जितेंद्र बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला, पण त्याचा काही ठावठिकाणा लागला नाही आणि अखेर शोध बंद केला.
सात वर्षांनी शीलूने जेव्हा सहज इन्स्टाग्रामवर सर्च करत होती, तेव्हा तिला जितेंद्र दुसऱ्या महिलेसह रील बनवताना दिसला. हा व्हिडिओ पाहून शीलूला धक्का बसला आणि तिने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिचा आरोप आहे की हुंडा प्रकरणाच्या आरोपांतून वाचण्यासाठी जितेंद्र आणि तिच्या वडिलांनी हा सगळा कट रचला. शीलूच्या तक्रारीनुसार, जितेंद्रने दुसरे लग्न करून आपली फसवणूक केली आहे. शीलूच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरण नोंदवले आहे. पोलीस मोबाइल लोकेशनच्या आधारे जितेंद्रचा शोध घेत आहेत. जितेंद्र ताब्यात आल्यावर दुसरी बाजू कळणार आहे.