गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींची चलती

नाक्यानाक्यांवर असलेली पोलिसांची यंत्रणा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती राज्यात ठिकठिकाणी पुजल्या गेल्या आणि विसर्जनानंतर त्या जलस्रोतांच्या अस्तित्वाला धोके निर्माण करू लागलेल्या आहेत.

Story: विचारचक्र |
03rd September 2025, 12:26 am
गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींची चलती

स्टर ऑफ पॅरिसच्या विज्ञानाने लावलेल्या शोधामुळे वैद्यकशास्त्राला मोठ्या प्रमाणात मदत झालेली असली तरी त्याचा उपयोग गेल्या काही वर्षांपासून देवदेवतांच्या मूर्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे. साहजिकच त्यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण झालेली आहे. पूजनानंतर अशा मूर्तींचे जेव्हा पाण्यात विसर्जन केले जाते, तेव्हा या मूर्तीत असलेले घटक सहसा पाण्याशी एकरूप होत नाहीत. विसर्जन म्हणजे मातीची मूर्ती मातीशी एकरूप होणे. तिने भूमीच्या सर्जनाला प्राधान्य देणे हे गरजेचे असताना, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतील घटक ना पाण्यात सहजपणे विरघळतात, ना मातीत. त्यामुळे जलप्रदूषणाची समस्या गंभीर होऊन जलचरांचे अस्तित्व दुर्बल होते. त्याबरोबरच मासेखाऊ सर्वसामान्यांनाही नानाविविध रोगांची शिकार व्हावे लागते.

दोन दशकांपूर्वी गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश आणि अन्य देवदेवतांच्या मूर्तींच्या पूजन परंपरेतील वापरावर कोणतेच कायदेशीर निर्बंध नसल्याकारणाने अशा विसर्जित केलेल्या मूर्ती तळ्यात, नदीच्या पात्रात प्रदीर्घ काळ तरंगत असलेल्या पहायला मिळायच्या. गणेश विसर्जनानंतर विद्रूप झालेल्या या मूर्ती जलस्रोतातील जलचरांना नानाविविध रोगांनी, समस्यांनी ग्रस्त होण्याबरोबर त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांनाही त्याचा मनस्ताप देण्यास कारणीभूत ठरतात. सोशल मीडियावर या मूर्तींचे येणारे फोटोही श्रद्धाळूंना यातना देणारे असतात. आपण ज्या देवाला भक्तीभावाने पुजतो, ती विसर्जनानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने त्याची विटंबना झाल्याचे दृश्य गोव्यात चतुर्थीच्या कालखंडात पहायला मिळते. सध्या पणजीजवळ असलेल्या करंझाळे येथील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तुटलेल्या, फुटलेल्या स्थितीत तरंगताना आढळल्याने तो विषय चर्चेचा बनलेला आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींतील घटक आणि त्यांना रंगविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक रंगांमुळे पाण्यात शिसे, कॅडमियम, पारा, तांबे अशी घातक तत्त्वांनी युक्त रसायने मिसळतात आणि त्यामुळे असे दूषित पाणी प्यायलेल्यांना हगवण, आमांश तसेच चर्मरोगांची शिकार व्हावी लागते. आंघोळ केलेल्यांनाही विविध रोगांनी ग्रस्त व्हावे लागते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती दिसायला आकर्षक, वजनाने हलक्या असल्याने त्यांच्या वापराकडे लोकांचा कल निर्माण झालेला आहे. परंतु त्यांच्या विसर्जनाने उद्भवणाऱ्या पर्यावरणीय समस्यांबाबत समाजात अनभिज्ञता होती. याच्या विरोधात पर्यावरण कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध मोहिम राबवल्याने शेवटी गोवा सरकारने अशा मूर्तींवर प्रतिबंध घातला.

कायद्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या वापरावर सरकारची बंदी असताना आणि पर्याय म्हणून लोकांनी मृण्मयी मूर्तीची पूजा करावी यासाठी गोवा सरकारने राज्य हस्तकला महामंडळाच्या वतीने पारंपरिक गणेश मूर्तिकारांना अनुदान देण्याची योजना लागू केली. २०१२ साली ५२८ मूर्तिकारांनी ५८ हजार मूर्तींसाठी ५८ लाखांच्या अनुदानाचा लाभ घेतला होता. २०१३ साली तीन हजाराने मूर्तींची संख्या कमी झाली. २०१४ वर्षी ४९० मूर्तिकारांचे ५५ लाख रुपयांचे अनुदान महामंडळाने दिले होते. गोवा सरकारने खरेतर हे महामंडळ सशक्त होईल आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बिनदिक्कतपणे विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज होती. परंतु या संदर्भात गोव्यात सहजपणे ज्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बाजारपेठेत येतात, त्याविरोधात गोवा सरकारचे पोलीस, महसूल आणि पर्यावरण खाते त्याचप्रमाणे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची संयुक्तरित्या कडक कारवाई केली जात नसल्याने, अशा मूर्ती परिसरातील पर्यावरण, वन्यजीव, जलस्रोत आणि जंगलक्षेत्र यांच्या अस्तित्वावर घाला घालण्यास कारणीभूत ठरलेल्या आहेत.

गोवा सरकारने हस्तकला महामंडळामार्फत २००८ पासून ही योजना राबविण्यास प्रारंभ केला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर गणेश चतुर्थीत कायमस्वरूपी बंद व्हावा म्हणून पारंपरिक मूर्तिकारांनी मृण्मयी गणेश मूर्तींना साकारण्यासाठी प्राधान्य द्यावे, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. महामंडळामार्फत मूर्तिकारांसाठी एका मूर्तीमागे १०० रुपये अनुदान दिले जात असून, एका मूर्तिकाराला २५० मूर्तींसाठी २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली होती.

२०१२ मध्ये राज्यातील ५२८ मूर्तिकारांनी या योजनेचा लाभ घेतला होता. परंतु २०१३ त्यातील ३८ मूर्तिकारांची संख्या कमी झाली. आता महामंडळातर्फे ही योजना सरकारने कार्यान्वित ठेवलेली असली तरी अशा मूर्तींचे प्रस्थ मात्र पर्यावरणाला त्रासदायक करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

महामंडळाने सुरू केलेल्या अनुदानाचा फायदा जसा पारंपरिक स्थानिक कलाकारांनी मिळवला, तसाच त्याचा गैरफायदा घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे पाठबळ लाभलेले स्वार्थांध या व्यवसायाच्या माध्यमातून योजनेची मलई लाटण्यासाठी सिद्ध झालेले आहेत. आपण पारंपरिक मूर्तिकार आहोत, याचा गैरफायदा घेत त्यांनी सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील दोडामार्ग, वेंगुर्ला त्याचप्रमाणे कारवार, बेळगाव, खानापूर येथील मूर्तिकारांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती खरेदी करून त्यांना व्यवस्थितरित्या बाहेरून मातीचा गिलावा देऊन त्या मृण्मयी मूर्ती असल्याचा बहाणा महामंडळाकडे करून अनुदान योजनेचा लाभ घेण्यास प्रारंभ केलेला आहे. गोव्यात पेडणे, डिचोली येथील मोजक्याच कुंभार, च्यारी आणि अन्य जाती जमातीतील कुटुंबांनी मृण्मयी गणेश मूर्ती करण्याची परंपरा प्रतिकूल परिस्थितीत जपलेली असताना आज प्रत्येक मूर्तीमागे महामंडळ अनुदान देत असल्याने त्याचा गैरफायदा लुटणारे काही आगंतुक राज्यभर सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे सरकारने राबवलेल्या एका चांगल्या योजनेचा बोजवारा उडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

गोव्याच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांशी संलग्न असलेल्या सीमेद्वारे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती येथे कायदेशीर बंदी असताना बिनदिक्कतपणे आणल्या जात असतात. नाक्यानाक्यांवर असलेली पोलिसांची यंत्रणा हेतुपुरस्सर या बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती राज्यात ठिकठिकाणी पुजल्या गेल्या आणि विसर्जनानंतर त्या जलस्रोतांच्या अस्तित्वाला धोके निर्माण करू लागलेल्या आहेत. उत्सव हे आनंद आणि दैवताप्रती भक्तीभाव व्यक्त करण्याचे माध्यम असताना आपण आपल्या काही अनिष्ट प्रकारांनी पर्यावरण प्रदूषणाबरोबर समाजात उपद्रव निर्माण करत आहोत, याची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशी कृत्ये वाढत राहतील आणि मानवी जीवनाला नाना विविध संकटांनी संत्रस्त करत राहतील, यात शंका नाही.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५