सामंजस्यामुळे खटल्याला विराम, आरोपींची निर्दोष मुक्तता

धुळेर म्हापसा येथील साजन नार्वेकर हल्ला प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd September 2025, 12:11 am
सामंजस्यामुळे खटल्याला विराम, आरोपींची निर्दोष मुक्तता

म्हापसा : धुळेर येथे २०१७ मध्ये वैयक्तिक वादातून घडलेल्या साजन मारूती नार्वेकर यांच्यावरील खुनी हल्ला प्रकरणी पीडित आणि फिर्यादींनी खटल्याला समर्थन दिले नाही. यामुळे आरोपी प्रकाश शिवाजी तलवार व इरफान हरूण शेख यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने केली आहे.

फिर्यादी आणि संशयितांनी सामंजस्याने प्रकरण मिटवल्यामुळे सरकारी पक्षाला शिक्षापात्र गुन्हा सिद्ध करण्यास अपयश आल्याचे निरीक्षण न्यायाधीश अपूर्वा नागवेकर यांनी या निवाड्यात नोंदवले आहे.

पीडित साजन नार्वेकर यांनी आपल्यावर आरोपींनी बेसबॉल बॅट आणि चॉपरने हल्ला केल्याची साक्ष दिली होती. परंतु उलटतपासणीत त्याने आपल्यावर हल्ला कुणी केला हे अद्याप माहिती नाही, हल्लेखोरांना पाहिले नव्हते आणि दोन्ही आरोपींना चुकून हल्लेखोर म्हणून ओळखले होते. हल्ला मागून झाला होता, असे म्हटले होते. यामुळे हल्लेखोरांची ओळख पटवणारा कोणताही विश्वसनीय पुरावा नाही. सरकारी पक्षाने गोळा केलेले पुरावे हे केवळ पुराव्याची पुष्टी करतात.

मात्र, फिर्यादी पक्षाने प्रकरण सामंजस्याने मिटवले असल्याने तक्रारदार आणि पीडिताची उलटतपासणी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे साक्षीदारांच्या बाबतीत सौम्य दृष्टीकोण बाळगला जात असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने या निवाड्यात नोंदवले आहे.

दरम्यान, २६ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी धुळेर येथे साजन नार्वेकर (शिळपे, धुळेर) या तरुणावर बेसबॉल बॅट व चॉपरने प्राणघातक हल्ला झाला होता. पीडिताच्या आईच्या तक्रारीवरुन म्हापसा पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ५०४, ३०७ व ३४ कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. दि. २७ डिसेंबर रोजी प्रकाश तलवार व इरफान शेख यांना अटक केली होती. तसेच नोव्हेंबर २०१८ मध्ये संशयितांविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. संशयितांवर जानेवारी २०२० मध्ये आरोप निश्चित करण्यात आले होते.

२०१७ मध्ये तरुणावर झाला होता हल्ला

२६ डिसेंबर २०१७ रोजी धुळेर येथे साजन नार्वेकर या तरुणावर बेसबॉल बॅट व चॉपरने हल्ला झाला होता. म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन संशयितांना अटक केली होती. जानेवारी २०२० मध्ये संशयितांवर आरोप निश्चित करण्यात आले.