भूकंपात आतापर्यंत ८०० लोकांचा मृत्यू : भारतापर्यंत जाणवले धक्के

काबुल : अफगाणिस्तानातील पूर्वेकडील प्रांतांना रविवारी मध्यरात्री भूकंपाचा जोरदार धक्का बसला. ६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपात आतापर्यंत ८०० लोकांचा मृत्यू झाला असून, २५०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. भूकंप झाला तेव्हा बहुतेक नागरिक झोपेत असल्याने ते इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार (यूएसजीएस), भूकंपाचा केंद्रबिंदू २ लाख लोकसंख्या असलेल्या जलालाबाद शहरापासून सुमारे २७ किमी अंतरावर होता. राजधानी काबूलपासून हे अंतर १५० किमी आहे. रविवारी मध्यरात्री ११ वाजून ४७ मिनिटांनी हा भूकंप झाल्यानंतर संपूर्ण रात्रभर धक्के जाणवत होते. यानंतर सोमवारी ४.६ तीव्रतेचा दुसरा धक्का बसला.
भूस्खलनामुळे बचावकार्यात अडथळे
सर्वाधिक मृत्यू हे शेजारील कुनार प्रांतात झाले आहेत. सरकारी प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनीदेखील पूर्वेकडील प्रांतांमध्ये गंभीर जीवित व वित्तहानी झाल्याचे म्हटले आहे. हा संपूर्ण भाग डोंगराळ असल्याने आणि भूकंपानंतर झालेल्या भूस्खलनामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत असून, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मदतकार्य सुरू आहे.पाकिस्तान, भारतातही भूकंपाचे धक्के : या भूकंपाचे धक्के पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा आणि पंजाब प्रांतांतही जाणवले. याशिवाय, भारताच्या गुरुग्राम शहरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे.
भूकंपांचा विनाशकारी इतिहास
अफगाणिस्तानला भूकंपांचा मोठा इतिहास आहे. यापूर्वी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपात तालिबान सरकारने ४,००० मृत्यू झाल्याचा दावा केला होता, तर संयुक्त राष्ट्रांनी १,५०० मृत्यूंची पुष्टी केली होती. तसेच, २०२२ मध्ये आलेल्या ५.९ तीव्रतेच्या भूकंपात सुमारे १,००० लोकांचा मृत्यू झाला होता. हिंदूकुश पर्वतरांग भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत सक्रिय मानली जाते.
२० मिनिटांनी पुन्हा भूकंप
१) पहिल्या धक्क्यानंतर साधारण २० मिनिटांनी पुन्हा एकदा ४.५ तीव्रतेचा दुसरा भूकंप बसला. याची तीव्रता कमी असली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
२) गेल्या एका महिन्यात अफगाणिस्तानात हा पाचवा भूकंप ठरला आहे, अशी माहिती नांगरहार सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रवक्ते नकीबुल्लाह रहीमी यांनी दिली.
३) याआधी २७ ऑगस्टला ५.४, १७ ऑगस्टला ४.९, १३ ऑगस्टला ४.२ आणि ८ ऑगस्टला ४.३ तीव्रतेचे भूकंप धडकले होते.