ग्रामसभेत मागणी : एका घरात ८० हून अधिक मतदारांची नोंद
सुरावली ग्रामसभेत समस्या मांडताना ग्रामस्थ. सोबत पंचायत मंडळ.
मडगाव : सुरावली येथील ग्रामसभेत मतदारयादीतील परप्रांतीय नागरिकांच्या नावांचा मुद्दा चर्चेला आला. गावातील मतदार यादीची प्रत्यक्ष पाहणी करून पुनरिक्षण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली, कारण यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार धोक्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
ग्रामस्थ केविन सुझा, ग्वेन्सिया गोम्स, आणि झेकील गोम्स यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी गावातील एका घरात ८० पेक्षा जास्त मतदारांची नोंद झाल्याचे समोर आले आहे. यामुळे ठराविक लोकांना फायदा मिळून गावाचा विकास थांबेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. कर्नाटक आणि इतर राज्यांतून निवडणुकीच्या वेळी येऊन मतदान करून परत जाणाऱ्या मतदारांमुळे गावातील लोकशाही धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे प्रत्येक घराची पाहणी करून मतदारयादी दुरुस्त करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
कचरा, वाहतुकीचा प्रश्नही ऐरणीवर
पंच सदस्य डोमिंगो फर्नांडिस यांनी सांगितले की, मतदारयादीवर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाला सर्वेक्षण करण्याची विनंती करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, गावातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परप्रांतीय नागरिक वाहनांतून रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात. सदर कचरा भटके कुत्रे विस्कटून टाकतात, ज्यामुळे अस्वच्छता पसरते. येथील कचरा नियमितपणे उचलण्याची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली.
अंडरपास, बायपासच्या समस्या कायम
ग्रामसभेत वेस्टर्न बायपासवरील वाहतुकीचा मुद्दाही चर्चेला आला. कमी अंतरामुळे चुकीच्या बाजूने वाहने येत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. संबंधित विभागाने सूचना फलक लावून किंवा इतर उपाययोजना करून यावर कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच, सुरावलीतील अंडरपासमध्ये कायम पाणी साचून राहत असल्यामुळे तो वापरण्यायोग्य नाही. त्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.