गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत

पोलीस महासंचालक : मुंगूल गोळीबारप्रकरणी राज्यातील गुन्हेगारांना संदेश

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th August, 05:05 pm
गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत

मडगाव : गोव्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. मडगावच्या मुंगूल येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी आरोपींना पकडल्यानंतर पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी गुन्हेगारांना स्पष्ट इशारा दिला आहे. यापुढे गँगवॉर खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा मुख्यालयात झालेल्या बैठकीत पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी गँगवॉर आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांचा आढावा घेतला. यावेळी दक्षिण गोवा पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुंगूल येथील गोळीबारातील आरोपींना अटक करून पोलिसांनी एक कठोर संदेश दिला आहे.

या बैठकीनंतर बोलताना, आलोक कुमार यांनी सांगितले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक पावले उचलली जातील. गोव्यात कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी वाढू दिली जाणार नाही. यापुढे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिक सतर्क असतील. गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल. जनतेने सुरक्षित राहावे आणि कोणत्याही गुन्हेगारी कृत्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

नोंद नसलेल्या सुरक्षा एजन्सींवर होणार कारवाई

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निर्देशानुसार, पोलिसांनी नोंदणीकृत सुरक्षा एजन्सीची यादी जाहीर केली आहे. या संदर्भात, पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले की, नागरिकांनी सुरक्षा रक्षक नेमताना केवळ नोंदणीकृत एजन्सीकडूनच घ्यावेत. नोंद नसलेल्या एजन्सींची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

गँगवार प्रकरणीकारवाई सुरूच

राज्यात छोट्या छोट्या गँगची निर्मिती होत असल्याच्या प्रश्नावर पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले की, अशाप्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी दक्षिण गोवा, उत्तर गोवा व गुन्हे शाखा यांच्याकडून कडक कारवाईची पावले उचलण्यात येत आहेत. तसेच कुंकळ्ळी पोलिसांना मारहाण करण्यात आलेल्या सर्व संशयितांना अटक केलेली असून यापुढे असे प्रकार न होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असेही पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा