ग्रामसभेत मागणी : रस्त्यांच्या स्थितीवरही नाराजी व्यक्त
मडगाव : बेताळभाटी ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी सचिव नसल्यामुळे लोकांची कामे थांबली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या समस्येची दखल घेऊन तातडीने कायमस्वरूपी सचिवांची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी रविवारी झालेल्या ग्रामसभेत केली. सदर ग्रामसभा पंचायतीच्या बाजूला असलेल्या सभागृहात पार पडली.
सरपंच मिनू फर्नांडिस यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच इल्मा डायस यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली. ग्रामस्थांनी सांगितले की, सध्याच्या सचिवाकडे दोन पंचायतींचा कार्यभार असल्यामुळे ते बेताळभाटीमध्ये फक्त तीन दिवस येतात, ज्यामुळे विकासकामांचे निर्णय घेणे किंवा ती पुढे नेणे शक्य होत नाही. पंचायत संचालनालयाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी सचिवांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी गावातील रस्त्यांची दुरवस्था हाही एक महत्त्वाचा मुद्दा होता. भूमिगत वीजवाहिन्या टाकल्यानंतर रस्त्यांची डागडुजी आणि हॉटमिक्सिंग करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र ते पाळले गेले नाही. तात्पुरते खड्डे बुजवण्यासाठी फक्त दगड टाकण्यात आले, त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते सुरक्षित नाहीत. अपघात होण्यापूर्वीच रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली. यावर पंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्याचे उपसरपंचांनी सांगितले.
परप्रांतीयांची वाढती संख्या चिंतेचा विषय
याशिवाय, बेताळभाटी पंचायती क्षेत्रात वाढलेल्या परप्रांतीयांच्या संख्येबद्दलही ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. पोलिसांकडून भाडेकरूंची पडताळणी होत असली, तरी पंचायतीकडे त्यांची कोणतीही नोंद नाही. महिला, मुले आणि वृद्धांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पंचायतीने मोहीम राबवून परप्रांतीय रहिवाशांची ओळख पटवून त्यांची नोंद ठेवण्याची मागणीही करण्यात आली.