संशयिताला पाच दिवसांची पोलीस कोठडी
पणजी : सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली शिवोली-बार्देश येथील ६८ वर्षीय महिलेची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अनिल त्रिपाठी (रा. सिंगापूर) याला अखेर गोवा सायबर विभागाने अटक करण्यात यश मिळवले आहे.
शिवोली-बार्देश येथील बेर्नाडित फर्नांडिस (६८) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २६ ते २८ डिसेंबर २०२४ या दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून त्यांना वॉट्सअॅप कॉल आला. फोन करणाऱ्याने स्वतःला दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवले. त्याने तक्रारदाराच्या नावाने गुन्हा दाखल झाल्याचे सांगून तिच्या ओळखपत्रांचा वापर करून मनी लाँड्रिंग झाल्याची भीती दाखवली. एवढेच नव्हे तर तिच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे पत्र आले असल्याचेही सांगितले.
या दबावाखाली तिला हे प्रकरण मिटवण्यासाठी विविध बँक खात्यांमध्ये तब्बल १ कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडण्यात आले. घडलेल्या प्रकारानंतर तिने सायबर विभागाकडे धाव घेतली.
तक्रारीची दखल घेत सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान याप्रकरणी यरमला वेंकटेश्वरलू, विषक आर, मोहम्मदशून सुलेमान, रोशन शेख, राहूल मिश्रा यांना अटक करण्यात आली होती. या सर्व संशयितांच्या चौकशीत मुख्य सूत्रधार अनिल त्रिपाठी असल्याचे स्पष्ट झाले. तो सिंगापूर येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
दरम्यान, त्रिपाठी सिंगापूरहून भारतात परतला असता, दिल्ली विमानतळावर त्याला स्थानिक यंत्रणेकडून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गोवा सायबर विभागाला याची माहिती देण्यात आली.
गोव्यात आणून अटक
उपनिरीक्षक अनिल पोळेकर आणि हवालदार अनय नाईक यांच्या पथकाने १५ ऑगस्ट रोजी संशयिताला दिल्लीहून गोव्यात आणले. त्यानंतर त्याला औपचारिक अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या अनिल त्रिपाठीला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.