ताळगाव ग्रामसभा : भटके कुत्रे आणि गुरांच्या वाढत्या समस्येवर चर्चा

ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले तरच समस्या सुटेल : सरपंच फर्नांडिस

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th August, 04:54 pm
ताळगाव ग्रामसभा : भटके कुत्रे आणि गुरांच्या वाढत्या समस्येवर चर्चा

पणजी : ताळगाव ग्रामसभेत आज भटक्या कुत्र्यांबरोबरच भटक्या गुरांच्या वाढत्या त्रासावर चर्चा झाली. यावेळी पंचायत सदस्यांनी एनजीओच्या सहकार्याने श्वानांचे निर्बीजीकरण करण्याचा निर्णय घेतला. तसेच गावातील लोकांनी कुत्र्यांना खायला देण्याऐवजी त्यांचे जेवण एनजीओमार्फत पुरवावे, अशी सूचना करण्यात आली.

ग्रामसभेत सरपंच मारिया फर्नांडिस यांनी सांगितले की, सांताक्रुझ आणि इतर भागांतून अनेक गुरे ताळगाव परिसरात येतात. त्यामुळे त्यांची संख्या वाढली असून यामुळे अपघातांचाही धोका निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी गावात गायींची कत्तल झाल्याची घटना घडली होती. अशा प्रकारच्या घटना गुन्हा असून त्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.

ग्रामस्थांनी पंचायत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. यावर सरपंचांनी स्पष्ट केले की, पॉज या एनजीओच्या मदतीने श्वानांचे निर्बीजीकरण सुरू करण्यात येईल. मात्र गावातील अनेक लोक रात्री भटक्या कुत्र्यांना खायला देतात, त्यामुळे ते एका ठिकाणी जमा होतात. अशा लोकांची ओळख पटवून त्यांच्याशी चर्चा केली जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अन्न टाकू नये, अशी विनंती ग्रामस्थांना करण्यात आली.

यावेळी सरपंच फर्नांडिस यांनी ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले तरच ही समस्या सोडवता येईल, असे सांगून भटक्या कुत्र्यांबरोबरच गुरांच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले.