पोलीस तपास सुरू
वास्को : सांकवाळ-झुआरीनगर येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये तृतीय वर्षात् शिकणारा कुशाग्र जैन (२०, रा. लखनौ, उत्तर प्रदेश) हा विद्यार्थी शनिवारी आपल्या खोलीतील पलंगावर मृतावस्थेत आढळला. प्रथमदर्शनी हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे वेर्णा पोलिसांनी सांगितले असून, खबरदारी म्हणून पुढील चौकशी सुरू आहे.
डिसेंबर २०२४ ते मे २०२५ या कालावधीत कॅम्पसमध्ये तीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे तत्कालीन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी अहवाल मागवला होता. त्यानंतर व्यवस्थापनाने कॅम्पसमध्ये अनेक सुविधा आणि सुधारणा लागू केल्या होत्या. तरीही शनिवारीची घटना कॅम्पससाठी धक्कादायक ठरली.
कुशाग्र जैन प्रतिभावान विद्यार्थी होता. मागील सेमिस्टरमध्ये चांगले गुण मिळवले होते. पुढील सत्र सुरू होणार असल्याने तो नुकताच कॅम्पसमध्ये परतला होता. त्यामुळे शैक्षणिक किंवा मानसिक तणावाचा प्रश्न नाही. बिट्स पिलानी प्रशासनाने आधीच्या घटनांनंतर विद्यार्थ्यांचा समवयस्क गट तयार केला होता. प्रत्येक गटात दहा विद्यार्थी ठेवले होते आणि ते एकमेकांच्या संपर्कात राहात होते. शनिवारी सकाळी कुशाग्र दिसून न आल्याने आणि मोबाईलवर प्रतिसाद न दिल्याने सहाध्यायांनी प्राध्यापकांना कळवले. त्यानंतर त्याच्या खोलीचे दार ठोठावले गेले, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीतून पाहिले असता तो पलंगावर निपचित अवस्थेत आढळला. डॉक्टरांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे निश्चित केले.
पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आनंद शिरोडकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत. कुशाग्राच्या वडिलांनी शुक्रवारी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रतिसाद मिळाला नव्हता. घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली असून त्याचे नातेवाईक गोव्यात पोहोचले आहेत.