पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन मागच्याच आठवड्यात संपले. मंत्री, आमदारांचे वेतन व भत्ते हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. अधिवेशन काळात वाहतूक खर्च, दैनंदिन भत्ता मिळून आमदाराला दिवसाकाठी ५ हजार रूपये मिळायचे, अशी माहिती विधीमंंडळाच्या लेखा विभागातून मिळाली आहे.
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंंत चालले. अधिवेशनाचा कालावधी १५ दिवसांंचा होता. यामुळे एका आमदाराच्या खात्यात अधिवेशनासाठी ७५ हजार रूपये जमा झाले आहेत. एखाद्या दिवशी आमदार गैरहजर राहिला तर त्या दिवसाचा भत्ता व खर्च त्याला मिळत नाही. भत्ते व खर्चासाठी आमदाराला काही काळ तरी सभागृहात हजर राहणे आवश्यक असते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अधिवेशनासाठीचे दिवसाला २ हजार रूपयांचे मानधन व प्रवास खर्च, राहण्याचा खर्च म्हणून आणखी ३ हजार रुपये मिळतात. मात्र याचा त्यांचे महिन्याचे वेतन, पेट्रोल भत्ता याच्याशी संंबंंध नसतो, अशीही माहिती मिळाली.
विधीमंडळाकडून फक्त आमदाराना दिवसाकाठी ५ हजार रूपये भत्यापोटी दिले जातात. यात मुख्यमंत्री, इतर मंंत्री, सभापती व उपसभापती यांचा समावेश होत नाही. मंत्री व सभापतींना दिवसाला ५ हजार रुपये दिले जात नाही. त्याना स्वतंत्र वेतन असते. त्या वेतनात अधिवेशन काळातील भत्यांचा समावेश असतो. त्याचा हिशेब विधीमंडळ खात्याकडे नसतो, असेही अधिकाऱ्याने सांंगितले.