राज्यात संततधार; चार दिवस मध्यम पावसाचा ‘यलो अलर्ट’

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16 hours ago
राज्यात संततधार; चार दिवस मध्यम पावसाचा ‘यलो अलर्ट’

पणजी : बुधवारी राज्यात संततधार पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी सकाळी जोरदार पाऊस पडला. तर दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. हवामान खात्याने १४ ते १७ ऑगस्ट दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर १८ आणि १९ ऑगस्ट दरम्यान तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
बुधवारी सकाळी पणजीत जोरदार पावसाची नोंद झाली. दुपारनंतर रात्री पर्यंत पावसाची संततधार सुरू होती. राज्यात चोवीस तासात सरासरी ९.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यादरम्यान दाबोळीत २१.४ मिमी, १८.८ मिमी तर फोंडामध्ये १२ मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी पणजीत कमाल २६.६ अंश तर किमान २४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगाव मधील कमाल तापमान २८ अंश व किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस राहीले.
राज्यात १ जून ते १३ ऑगस्ट दरम्यान सरासरी ८१.७४ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण १२.१ टक्क्यांनी कमी आहे. वरील कालावधीत धारबांदोडामध्ये सर्वाधिक ११०.८२ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर सांगे येथे १०८.४० इंच, वाळपईमध्ये १०४.९० इंच, केपेमध्ये १०१.५४ इंच तर फोंडामध्ये ८८.८५ इंच पावसाची नोंद झाली आहे.