गोमेकॉतील तज्ज्ञांचा अभ्यास : गोवा विद्यापीठाकडून कृती दल समिती स्थापन
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) दाखल झालेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडविषयक (क्रॉनिक किडनी) आजारांसाठी (सीकेडी) उपचार घेण्याचे मुख्य कारण मधुमेह आणि उच्च रक्तदाब असल्याचे समोर आले आहे. गोमेकॉच्या नेफ्रोलॉजी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या एका अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यासाठी विभागात दाखल झालेल्या ३४५ रुग्णांचा सखोल अभ्यास करण्यात आला. यातील २१४ उत्तर गोवा जिल्ह्यातील, तर १३१ दक्षिण गोवा जिल्ह्यातील होते.
तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातील माहितीनुसार, एकूण सीकेडी रुग्णांपैकी ५१ टक्के रुग्णांमध्ये हा आजार होण्याचे कारण मधुमेह होते. यानंतर उच्च रक्तदाब, क्रॉनिक ग्लोमेरूलोनेफ्राईटीस, क्रॉनिक नेफ्रेटीस, मूतखड्याशी संबधित आजार आणि वेदना शमन करणाऱ्या औषधांचा वापर व अन्य कारणांचा समावेश होता. दक्षिण गोव्यातील एकूण सीकेडी रुग्णांपैकी २९ जणांमध्ये या आजाराचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. यातील २२ रुग्ण हे एका काणकोण तालुक्यातील विविध गावांतून आलेले होते. हे रुग्ण मासेमारी किंवा काजू अथवा सुपारीच्या बागेत काम करत होते.
बार्देश तालुक्यातील ५६ टक्के रुग्णांना मधुमेहामुळे मूत्रपिंडविषयक आजार झाल्याचे स्पष्ट झाले होते. क्रॉनिक नेफ्रेटीसमुळे १८.६५ टक्के, तर वेदना शमन करणाऱ्या औषधांचा वापर केल्यामुळे आजार झालेले १५.२५ टक्के रुग्ण होते. काणकोण तालुक्यातील सीकेडीच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी गोवा विद्यापीठाने कृती दल समितीची स्थापना केली आहे. समितीमध्ये गोमेकॉतील दोन तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.
डायलेसिस करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, मागील चार वर्षांत डायलेसिस करण्यासाठी गोमेकॉत दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे. २०२१-२२ मध्ये डायलेसिस करणारे २३४ रुग्ण होते. २०२४-२५ मध्ये ही संख्या तब्बल ७१ ने वाढून ३०५ झाली. यातील सर्वाधिक ६३ रुग्ण हे सासष्टी तालुक्यातील होते. त्यानंतर फोंडा तालुक्यातील ४४, बार्देश तालुक्यामधील ३४ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते.