मुंगूल हल्ला : आठ जणांना अटक

मडगाव न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी


16 hours ago
मुंगूल हल्ला : आठ जणांना अटकसंशयितांना न्यायालयात नेताना पोलीस. (संतोष मिरजकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मुंगूल फातोर्डा येथील हल्ला आणि गोळीबारच्या घटनेत फातोर्डा पोलिसांनी याआधी तिघांना अटक केली होती. आता आणखी पाच जणांना अटक केली आहे. सर्व आठही संशयितांना मडगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंगूल माडेल येथे मंगळवारी पहाटे गाडी अडवून तलवार, कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात जबर मार बसलेल्या दोघांची तब्येत गंभीर आहे. दोन गटांमधील पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला होता. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली फातोर्डा पोलिसांनी पाच संशयितांविरोधात लुकआउट नोटीस जारी केली होती. काहीजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यातील विल्सन कार्व्हलो, शाहरुख (रा. दवर्ली), रसूल (रा. मडगाव) यांना अटक करण्यात आली होती. पुढील तपासात आणखी पाच संशयितांना अटक करण्यात आली. या सर्व संशयितांना पोलिसांनी बुधवारी मडगाव येथील न्यायालयात हजर केले.
मुंगूल येथे संशयित अक्षय तलवार, राहुल तलवार (रा. बोर्डा), विल्सन कार्व्हलो, शाहरुख शेख (रा. दवर्ली), रसूल शेख (रा. मडगाव) यांच्यासह १५ अनोळखी व्यक्तींकडून मास्क घालून येऊन गाडी अडवली होती. त्यांनी रफीक ताशान (२४) व युवकेश सिंग बदैला (२०) यांना तलवार, कोयता, सोडा बॉटल्स अशा धारदार शस्त्रांनी मारहाण केली होती. याप्रकरणी यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली होती. आता संशयित मोहम्मद अली (२४), वासू कुमार (२४), सूरज माझी (१९), गौरांग कोरगावकर (२४), मलिक शेख (१८, रा. पर सुरावली, कोलवा) यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन कार जप्त
संशयित अक्षय तलवार व राहुल तलवार यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील संशयितांनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या इनोव्हा व फ्राँक्स अशा दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून काचेच्या बाटल्या, रक्ताचे नमुने व इतर पुरावे गोळा केले आहेत. सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.