राज्यातील सात प्राथमिक शाळा विद्यार्थी नसल्याने पडल्या बंद

काणकोणातील ३ शाळांना कुलूप : मराठी ६, तर कोकणी माध्यमाची १ शाळा


13th August, 05:06 am
राज्यातील सात प्राथमिक शाळा विद्यार्थी नसल्याने पडल्या बंद

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात सरकारी प्राथमिक शाळा बंद पडण्याचे सत्र सुरूच आहे. यंदा ७ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. यात ५ शाळा दक्षिण गोव्यातील, तर २ शाळा उत्तर गोव्यातील आहेत. बंद पडलेल्या ७ सरकारी शाळांंमध्ये ६ मराठी माध्यमांच्या, तर १ कोकणी माध्यमाची शाळा आहे.
यंदा एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नसल्याने शाळा बंद कराव्यात, असा आदेश शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केला आहे. तीन शाळा काणकोण तालुक्यातील, तर पेडणे, सत्तरी, सासष्टी व केपे तालक्यांतील प्रत्येकी एक शाळा बंद पडली आहे. २०२२-२३ पासून या शाळांतील विद्यार्थ्यांचा आकडा कमी होत गेला. यंदा विद्यार्थीच नसल्याने शाळा बंद करण्याची वेळ आली आहे.
एखाद्या शाळेत अत्यल्प विद्यार्थी असतील तर ती शाळा जवळच्या शाळेला जोडण्याची (मर्ज करणे) पद्धत काही वर्षांपूर्वी सुरू झाली. प्राथमिक शाळा टिकवून ठेवण्याचे सरकारचे घोरण असले तरी या धोरणाला फारसे यश आलेले नाही.