एमटेक विद्यार्थ्यांना वार्षिक ११.९९ लाख पगार
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गतवर्षी गोवा आयआयटीमधील बीटेक अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्याला प्लेसमेंटद्वारे वार्षिक ५१ लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली होती. राज्यातील अन्य अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या तुलनेत ही सर्वाधिक पगाराची नोकरी आहे. एमटेक केलेल्या विद्यार्थ्याला वार्षिक ४१.६० लाख रुपयांची नोकरी मिळाली होती. २०२४ मध्ये आयआयटी गोवामधून उत्तीर्ण झालेल्या बीटेक विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक १५.७७ लाख रुपये, तर एमटेक विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक ११.९९ लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांचा विचार करता २०२२ मध्ये गोवा आयआयटीमधून बीटेक केलेल्या विद्यार्थ्याला वार्षिक १.१२ कोटी रुपयांची नोकरी मिळाली होती. २०२३ मध्ये वार्षिक ६० लाख रुपयांची नोकरी मिळाली होती. २०२२ मध्ये आयआयटी गोवामधील बीटेक विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक २३.४ लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली. २०२३ मध्ये सरासरी वार्षिक १७.०७ लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली.
एमटेक अभ्यासक्रमाचा विचार करता २०२२ मध्ये एका विद्यार्थ्याला सर्वाधिक वार्षिक ४६ लाख रुपये, तर २०२३ मध्ये एका विद्यार्थ्याला वार्षिक १९ लाख लाख रुपयांची नोकरी मिळाली. २०२२ मध्ये आयआयटी गोवामधील एमटेक विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक १२.४ लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली. २०२३ मध्ये सरासरी वार्षिक १०.३५ लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली. एमटेक प्लेसमेंटसाठी २०२२ मध्ये ६५, २०२३ मध्ये ५८, तर २०२४ मध्ये ८४ कंपन्यांनी सहभाग घेतला होता.