लैंगिक अत्याचार प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : महसूलमंत्री अातानासियो (बाबूश) मोन्सेरात यांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मंत्री बाबूश मोन्सेरात यांची उलटतपासणी सुरू झाली आहे. मेरशी येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश ईर्शाद आगा यांच्या न्यायालयात पुढील सुनावणी १८ रोजी होणार आहे.
१६ वर्षीय पीडित मुलीने संशयित मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी गुंगीचे औषध देऊन आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप २०१६ मध्ये केला होता. त्याची दखल घेऊन पणजी महिला पोलिसांनी बाबूश यांच्यासह इतर दोघांविरोधात भा.दं.सं.च्या कलम ३७६, ३४२, ५०६ कलमांखाली तसेच बाल लैंगिक शोषणविरोधी कायदा २०१२ (पोक्सो)चे कलम ४ नुसार आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६७ बी नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी बाबूश यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता.
पणजी महिला पोलिसांनी १८ जुलै २०१८ रोजी उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात २५० पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात सुमारे ४० साक्षीदारांच्या साक्षी नोंद आहेत. न्यायालयाने ३ जून २०१९ रोजी आरोप निश्चितीचा आदेश दिला होता. दरम्यान, बाबूश यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आरोप निश्चितीच्या आदेशाला आव्हान दिले होते. हा अर्ज मागे घेतल्यानंतर न्यायालयाने बाबूश यांच्यासह इतर संशयितांविरोधात अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचे आरोप निश्चित करून खटला सुरू केला. न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांची उलटतपासणी पूर्ण केल्यानंतर बाबूश यांची ११ आॅगस्ट २०२५ रोजी उलटतपासणी सुरू केली. पुढील सुनावणी १८ आॅगस्ट रोजी होणार आहे.