१५ ऑगस्टनंतर नव्या मंत्र्यांची शपथ, खात्यांमध्येही बदल

मुख्यमंत्र्यांची श्रेष्ठींशी चर्चा : अमित शहा करणार ‘माझे घर’चे उदद्घाटन


16 hours ago
१५ ऑगस्टनंतर नव्या मंत्र्यांची शपथ, खात्यांमध्येही बदल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करताना मुख्यमंत्री  डॉ. प्रमोद सावंत.

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलासह खाते बदलाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बुधवारी दिल्लीत भेट घेतली. गोव्यातील अनेक विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘माझे घर’ योजनेच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सप्टेंबरमध्ये गोव्यात येणार आहेत.

गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून हटवल्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ फेररचनेची चर्चा जोरात सुरू आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी दिल्ली भेटीत मंत्रिमंडळ फेररचनेविषयी केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली होती. तेव्हा त्यांच्यासोबत आमदार मायकल लोबोही होते. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ फेररचना होईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मागील आठवड्यात अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अचानक दिल्ली दौरा केला. आसामात पोलिसांच्या पासिंग आऊट परेडला उपस्थिती लावल्यानंतर मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ फेररचनेसह अन्य विषयांवर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.      

गोविंद गावडे यांच्या जागी सभापती रमेश तवडकर यांना मंत्रिपद मिळणे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. शपथविधी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात खातेबदल होऊ शकतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, कला आणि संस्कृती, क्रीडा यांसह महत्त्वाची खाती आहेत. यातील काही खाती ते अन्य मंत्र्यांना देऊ शकतात. अन्य मंत्र्यांच्या खात्यांतही बदल होऊ शकतो.

एसटी विधेयक संमत केल्याबद्दल मानले आभार

गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींसाठी मतदारसंघ राखीव ठेवण्याची तरतूद असलेले ‘गोवा विधानसभा एसटी प्रतिनिधीत्व विधेयक २०२४’ लोकसभा आणि राज्यसभेत संमत झाले. राष्ट्रपतींच्या सहीनंतर गोवा विधानसभा एसटी प्रतिनिधीत्व कायदा अस्तित्वात येईल. हे विधेयक संमत केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले.

सप्टेंबरमध्ये अमित शहा येणार गोव्यात

गोमंतकीयांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सप्टेंबरमध्ये ‘माझे घर’ योजनेचा शुभारंभ करणार आहे. या योजनेचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या शुभारंभासह अन्य उपक्रम कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रण दिले. यावेळी दोघांमध्ये राजकीय चर्चाही झाली.

गोमेकॉत एमबीबीएस अभ्यासक्रमात आणखी ५० जागा वाढवा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन गोमेकॉत वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी (एमबीबीएस) ५० जागा वाढवण्याची मागणी केली. आणखी ५० जागा वाढवण्याचा प्रस्ताव सरकारने सादर केला आहे. या प्रस्तावाला लवकर मान्यता द्या, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.