मुलाखत शीला कोळंबकरांची

शीलाताईंनी मुंबई वास्तव्यात साहित्य अकादेमीचे प्रोग्राम व इतर अनेक संस्थांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं अनुभवविश्व, वाचनाच्या कक्षा, साहित्यकारांकडे आदान-प्रदान वाढवलं.

Story: ये आकाशवाणी है |
10th August, 12:38 am
मुलाखत शीला कोळंबकरांची

आकाशवाणीवर मुलाखती घेण्याची संधी मिळाली. विविध क्षेत्रातील मान्यवरांची. साहित्यिकांमध्ये शीलाताईंची मुलाखत यादगार राहिली. कथाकार शीला नायक पणजीच्या. लग्न होऊन कोळंबकर झाल्या व मुलुंड मुंबईत स्थायिक झाल्या. त्यांना मी साहित्य कार्यक्रमात भेटलो होतो म्हणून ओळख होती. त्यांचा स्वभाव किंचित मिस्किल व विनोदी पण. त्यामुळे याचा फायदा मुलाखत खेळती प्रवाही ठेवण्यास झाला. मुलाखतीत सहजता आली. 

शीलाताईंची मॅगी ही कथा गाजली आहे. ती पाठ्यपुस्तकात होती. एका गरीब शाळकरी मुलीची घुस्मट व भावविश्व त्यात शिताफीने दाखवलं आहे. ‘इल्लें शीं, इल्लें गर्मी’ ही त्यांची कथाही कोंकणीतील एक श्रेष्ठ कथा. कोंकणी कथा ठराविक साच्यातून बाहेर काढण्यास काही कथाकारांनी बहुमोल योगदान दिले त्यात शीलाताईंचा समावेश होता. 

मुंबईत इतकी वर्षे राहून सुध्दा कोंकणी भाषेचा, आपल्या पिढीचा गोडवा कसा काय सांभाळला असा एक प्रश्न मी मुलाखती दरम्यान विचारला. भाषेवर प्रेम असलं की झालं असं उत्तर दिल्याचं स्मरतं. आपली घडण होण्यात कॉलेजातील प्रा. एस. एस. नाडकर्णी व रवीन्द्र केळेकर यांचं मार्गदर्शन मोलाचं अशी माहिती त्यांनी दिली. कोळंबकर कुटुंबिय मूळ कारवारचे. कारवारला जाणं होतं तेव्हा तिथली किंचित वेगळी शब्दसंपदा कशी आहे त्यावर त्यांनी प्रकाश टाकला. ‘धनाची वेल’ म्हणून ‘धनेल’ हा शब्द ‘मनी प्लांट’ला तिथं वापरतात असं त्यांनी सांगितलं. शीलाताईंनी मुंबई वास्तव्यात साहित्य अकादेमीचे प्रोग्राम व इतर अनेक संस्थांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं अनुभवविश्व, वाचनाच्या कक्षा, साहित्यकारांकडे आदान-प्रदान वाढवलं. लेखकाच्या वृध्दीच्या या मुद्द्यावर चर्चा झाली. 

‘ओली सांज’ हा शीलाताईंच्या कथासंग्रहाचा मथळा. हा काव्यमय आहे कारण ओली सांजवेळ हे ओलसरपणाचं चिंब भावनांचं प्रतीक कसं आहे त्यावर मी एक प्रश्न विचारला. त्यांनी सहजतेने उत्तरे दिली. गप्पा मारल्यासारखी ही मुलाखत चालली होती. 

साहित्याच्या अनुवादाच्या गरजेवर मी प्रश्न विचारला. अनुवादांची फार नितांत गरज आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी इतर भाषातून साहित्य अकादेमीसाठी कोंकणीत अऩुवाद केले होते त्यावर चर्चा झाली. ‘भांगराचें सुकणें’ या पुस्तकात शीलाताईंनी डोगरी कथांचा अनुवाद कोंकणीत केला आहे. अनुवादात घ्यायची दक्षता याविषयी बोलताना त्यात पदरचं घालता येत नाही व आपणाला काही संकल्पना समजत नाही म्हणून ती कापता येत नाही हे अनुवादाचं आव्हान असतं असं त्यांनी सांगितलं. 

शीलाताईंना प्रवास आवडतो. देश विदेशातल्या भ्रमंतीवर त्यांनी अनेक लेख, निबंध लिहिले आहेत. या त्यांच्या प्रवासवर्णनावर मुलाखतीत छान बोलणी झाली. आपल्या आवडत्या स्थळांवर त्यांनी भाष्य केलं व प्रवासवर्णन साहित्यिक मूल्यं कशी टिकवावी ते मंत्र आणि तंत्र सांगितले.

शीलाताईंनी बालसाहित्य रचले आहे. ‘तेजस आणि ओजस’ तसेच ‘कावळ्या काक्या रे’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मुलांसाठी लिहिणं सोपं नाही व बालसाहित्य रचताना घेण्याची दक्षता या विषयावर मी त्यांना प्रश्न विचारला. त्यांना बालसाहित्य लिहायला आवडतं हे त्यांच्या एकंदर चर्येवरून वाटलं. मुलांची शब्दसंपदा म्हणजे व्होकेबलरी मर्यादित असते हे ध्यानात ठेवायला हवं, आपलं मन मुलासारखं करून नंतरच कथा लिहिण्यास सुरुवात करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आपल्या बालसाहित्याला मिळालेला उदंड प्रतिसाद आणि त्यातून प्राप्त झालेला आनंद त्यांनी आऩंदाने सांगितला. मुलाखत क्लायमॅक्सवर पोहोचली. 

लग्न होऊन मुंबईला गेल्यावर जो गोवा होता व आजचा गोवा यात फरक सांगा असं म्हटल्यावर त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात आमुलाग्र बदल झालेत ते विषद केले. आपण शाळा, कॉलेजात शिकताना पणजीत जी साधेपणाची लय होती त्यावर त्यांनी माहिती दिली. 

शीलाताईंची हसत खेळत झालेली मुलाखत स्मरणात राहिली. कायम.


मुकेश थळी 
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)