सल...!!

स्थलांतराचा दिवस जवळ येत होता तसतसा तिचा फळांचा बेत पक्का होत होता तोच आजी गेल्याची बातमी आली आणि इतके दिवस त्या इतक्या जवळ असूनही उगाच भविष्यातला बेत कुरवाळत राहिल्याची सल ईराच्या मनाला कुरतडत राहिली ती ही कायमची..!!

Story: कथा |
24th August, 12:16 am
सल...!!

‘ईरा, द्वारका आजी गेल्या.’ सारंग सर म्हणाले आणि ती सुन्न झाली क्षणभर. असं कसं होऊ शकतं; परवाच तर नव्हतं का पाहिलं मी त्यांना... ईरा चार-सहा महिन्यांपूर्वीच त्या ऑफीसमध्ये कामाला लागली होती. तशी ती इमारत तिला नवीन नव्हती; शहराच्या अगदी मध्यभागी असल्याने तिच्या जवळून जाणारे रस्ते, तिथली दुकानं तशी ईराला पूर्व परिचित होती. ती इमारत फार जुनी होती; अगदी स्वातंत्र्योत्तर काळातली. तिथे सगळी सरकारी कार्यालयं होती म्हणजे पूर्वी सगळी होती आता त्यातली चार दोन उरली होती नि बाकीची पांगलेली. ईरा ही चार-दोन वर्षांपासून त्या शहरात येत जात होती. कधीतरी आतल्या बाजूला येणं झालंच तर त्या इमारतीवरही ओझरती नजर पडायची. त्या इमारतीतल्या कार्यालयांबरोबरच तिचा मुख्य आकर्षण बिंदू होत्या 'द्वारका आजी'. त्या इमारतीत येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत व्हायचं ते आजींच्या सुहास्य वदनाने.

ईरा लगबगीने चालत होती; आज तिला उशीर करायचा नव्हता कारण तिच्या नोकरीचा पहिला दिवस होता. बसमधून उतरून ती पाठीवर बॅगपॅकचं ओझं सांभाळत झपझप पावलं उचलत होती. ऑफिसची इमारत नजर टप्प्यात आली आणि ती पटकन रस्ता ओलांडून समोर आली. ईराने एकवार इमारत न्याहाळली आणि आत प्रवेश करणार तोच तिच्या कानावर आवाज आला,"ए बाय... फळं घे ना; बघ तरी ताजी आहेत. घे घेऊन जा." तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं. तिथे हसऱ्या चेहऱ्याच्या वयस्कर आजी फळं घेऊन बसल्या होत्या. त्यांनीच तिला हटकलं होतं. "आजी, आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. फळं घ्यायला थांबले तर उशीर होईल; नंतर घेईन हं फळ." म्हणत ती पटकन आतमध्ये सटकली आणि आजी मान डोलवत बाकीच्या गिऱ्हाइकांमध्ये गर्क झाल्या.

त्या दिवसापासून रोज ईरा त्या आजींना बघायची. मी आणि आजी दोघी आहोत इथेच कुठे जातोय असा विचार करत फळं घेण्याचा विचार ती रोज पुढे ढकलायची. दोन-तीन महिने लोटले आणि इमारतीतल्या प्रत्येक कार्यालयाला स्थलांतराची नोटीस बजावण्यात आली कारण ती इमारत अत्यंत जुनी असल्याने जीर्ण होऊन धोकादायक बनल्याचा अहवाल सरकारकडे गेला होता. ईराला हे समजलं तेव्हा तिला पहिला विचार आला तो द्वारका आजींचाच. ही इमारत पाडली तर त्या कुठे जाणार ? कामाच्या गडबडीत तो विचार मागे पडला पण तिने मनाशी एक बेत पक्का केला होता ज्या दिवशी तिच्या ऑफिसचं स्थलांतर होईल त्या दिवशी द्वारका आजींकडून चांगली किलोभर फळं विकत घ्यायची. आता सगळीकडे स्थलांतराच्याच चर्चा रंगत होत्या. जो तो एकमेकांना विचार होता "तुम्ही कुठे जाताय ? झाली का तयारी ?" साऱ्यांचीच लगबग सुरू होती.

पूर्ण इमारतीत द्वारका आजी सर्वांच्याच परिचयाच्या. प्रत्येकजण आपल्या परीने त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करे. फळं विकत घेण्याबरोबरच त्यांच्या बारीकसारीक गोष्टी ही सगळे करत. फळांच्या पाटीला हात लाव, फळं रचून ठेव, दुपारी त्या जेवेपर्यंत त्यांच्या फळांची देखरेख कर, वेळप्रसंगी गिऱ्हाईक कर अशा ही गोष्टी काही जण करत. गोल चेहरा, बोलके डोळे, सदैव हसरे ओठ, किंचित स्थुलतेकडे झुकणारं शरीर आणि आपुलकीने ओथंबलेला गोड स्वर अशा द्वारका आजींना पाहाताच कुणाच्याही मनातल्या विवंचना क्षणभर का होईना दूर पळत असत. त्या येणाऱ्या प्रत्येकाची मायेने चौकशी करत, साहेबांपासून ते अगदी वॉचमेनपर्यंत सर्वांना हक्काने चार गोष्टी सांगत असत. एकदा लंच ब्रेकला ईरा नि सारंग त्यांच्या समोरून जात होते तोच द्वारका आजींनी‌ सारंगला हाक मारली. दोघंही त्यांच्याजवळ आले.

"ए सायबा, किती दिवस असा एकटा दुकटा फिरणार आहेस ? लग्न छानशा मुलीशी; तुझं लग्न पाहायचंय मला." आजी अधिकार वाणीने म्हणाल्या."अगं आज्जे, तू फक्त पोरगी हजर कर हा राहतो बघ बोहल्यावर उभा." सारंग गंमतीने बोलला त्यावर त्या मनमोकळ्या हसल्या. "ए‌‌ पोरी घे की गं फळं ..." त्यांनी पुन्हा एकदा आर्जवी स्वरात म्हटलं."येताना घेईन हो आजी; आता घेऊन बाजारात कुठे जाऊ ?" म्हणत ईराने पुन्हा टाळलं. येताना ईराला आठवण झाली पण द्वारका आजी जागेवर नव्हत्या म्हणून तेव्हा ही ते राहूनच गेलं. एक दिवस सकाळी लिफ्टसाठी उभी असताना तिचं लक्ष सहज जिन्याखाली गेलं. तिथे द्वारका आजी मुटकुळं करून झोपल्या होत्या. ते पाहून ईराच्या काळजात कालवाकालव झाली. त्याच दुपारी तिने आजींना फळं घेऊन बसलेलं पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरून कळत होतं त्या तापाने फणफणत होत्या.

एवढ्या वयात त्यांना काम का करावं लागत असेल ? ईराला नेहमी प्रश्न पडे म्हणून एक दिवस तिने सारंगला विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं. "आजींचा एक मुलगा व्यसनाधीन होऊन गेल्या वर्षी वारला. त्याचा मुलगा लहान आहे त्याच्या शिक्षणासाठी आजी आणि त्यांची सून धडपड करत आहेत. मध्यंतरी आजींनी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढत दिली." आजींची कहाणी ऐकून ईराला त्यांची कीव आली आणि त्यांच्या खंबीरपणाचं कौतुक ही वाटलं. स्थलांतराचा दिवस जवळ येत होता तसतसा तिचा फळांचा बेत पक्का होत होता तोच आजी गेल्याची बातमी आली आणि इतके दिवस त्या इतक्या जवळ असूनही उगाच भविष्यातला बेत कुरवाळत राहिल्याची सल ईराच्या मनाला कुरतडत राहिली ती ही कायमची..!!


अनु देसाई