स्मरणशक्ती आणि सिव्हिल सर्व्हिस परीक्षा

इतिहास जर लक्षात ठेवायचा असेल तर स्टोरी टेलिंग पद्धतीने सराव करावा लागतो. यासाठी खरंतर रिअल टाईममध्ये सोडवलेले मॉक टेस्ट खूप उपयोगी पडतात. टेंशन घेऊन पेपर सोडवायची सवय लागली की प्रत्यक्ष हॉलमध्ये टेंशन येत नाही.

Story: यशस्वी भव: |
24th August, 12:09 am
स्मरणशक्ती आणि सिव्हिल सर्व्हिस परीक्षा

अर्थातच स्मरणशक्ती ही फार महत्त्वाची आहेच. सर्वच ठिकाणी तिचा उपयोग होतो. खरंतर सामान्य जीवनात सुद्धा जर उत्तम स्मरणशक्ती असेल तर इतरांवर छाप पाडण्यासाठी याचा फार वापर होतो. खूप वर्षांनी एखादी व्यक्ती भेटली तर त्याच्या नावापासून, त्याच्या कामाबद्दल तसेच एखाद्या घटनेची उजळणी जर उत्तम स्मरण क्षमतेने केली गेली तर त्या व्यक्तीचे कौतुक तर होतेच, परंतु तोही व्यक्ती एक आदराने समोरच्या व्यक्तीच्या गुड बुक्स मध्ये रहातो. व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा फारच महत्त्वाचा गुण आहे.

परीक्षेमध्ये जर स्मरणशक्ती चांगली असेल तर खूप फायदा होतो. सिव्हिल सर्व्हिस परीक्षा खूपदा दोन प्रकाराने घेतली जाते – एक पूर्व परीक्षा (प्रिलीम) तर दुसरी मुख्य परीक्षा (मेन). प्रिलीममध्ये क्विक मेमरी लागते, कारण यात बहुविकल्पीय प्रश्न विचारले जातात. तर मेन परीक्षेमध्ये दीर्घकाळ स्मरणात ठेवलेले, साठवून ठेवलेले ज्ञान उपयोगी पडते.

यूपीएससी परीक्षेमध्ये जवळपास २० पेक्षा जास्त विषयांचा अभ्यास करावा लागतो. जो अभ्यासक्रम पूर्व परीक्षेला असतो, त्याच विषयांवर पुढे दिर्घोत्तरी प्रश्न-उत्तरे असतात. त्यामुळे ही स्मरणक्षमता वेगवेगळ्या पद्धतीने वापरावी लागते. परीक्षेसाठी अभ्यासक्रम खूप वास्ट असतो. त्यामुळे सर्व लहानमोठे तपशील लक्षात ठेवणे ही एक कला आहे. भूगोल, इतिहास, राजकीय, चालू घडामोडी, एथिक्स असे विषय असतात. या सर्व विषयांतील क्विक मेमरी रिकॉल सिस्टिम वापरावी लागते.

पूर्व परीक्षेमध्ये एमसीक्यू असतात आणि घड्याळ्याशी स्पर्धा करत ठराविक वेळेत ते सोडवावे लागतात. घटनेतील विशिष्ट आर्टिकल्स, सनावळ, आकडे, नावे, त्यातील व्यक्ती यांचे तपशील लक्षात ठेवावे लागतात. मेन्स परीक्षेमध्ये याच एका विषयातील इतर आवश्यक तपशील देखील लक्षात ठेवून लिहावा लागतो. त्यामुळे दोन्ही प्रकारात वेगवेगळे मेमरी टेक्निक्स वापरावे लागतात.

नुसते तोंडपाठ करून चालत नाही, तर त्याचे लिंक सुद्धा लावावे लागतात. उदा. एखादा डायरेक्टीव प्रिंसिपल ऑफ स्टेट हा विषय आला असेल तर त्यासाठी कनेक्टेड चालू शासकीय योजनेलाही लिंक करावे लागते. अशा प्रकारच्या अभ्यासासाठी प्रत्येक विषयावर स्वतःच्या नोट्स काढाव्या लागतात. याला रिलेशनल मेमरी सिस्टिम असे म्हणतात.

यासाठी फ्लोचार्ट अथवा मॅप्स बनवावे लागतात. उदा. दुसरे महायुद्ध जर लक्षात ठेवायचे असेल तर पहिल्या दिवसापासून युद्ध संपेपर्यंत घटना फ्लोचार्टमध्ये सनावळ आणि घटनाक्रमाने लिहाव्या लागतात. सन, घटना, परिणाम, त्यातील व्यक्ती या आल्या पाहिजेत. सतत असे चार्ट बनविल्याने फोटो इलेक्ट्रीक मेमरी वाढते, म्हणजे जे आपण बघतो ते आपल्याला कायम स्मरणात रहाते.

एखादी टीव्हीवरील जाहिरात जरी आपण रोज बघितली किंवा ऐकली तर कालांतराने ती कायमच लक्षात रहाते. खूपदा मोठ्या घटनेचे न्युमॉनिक्स पद्धतीने लक्षात ठेवावे लागतात. समजा घटनेतील सर्व आर्टिकल लक्षात ठेवायची असल्यास, त्यातील एका पाठोपाठ येणाऱ्या आर्टिकलची पहिली अथवा महत्त्वाचे अक्षरं लक्षात ठेवली तर त्याची एक कविता करता येते. व ती क्रमाने म्हटली की मुख्य आर्टिकल क्रमाने लक्षात रहातात. उदा. आर्टिकल १४, १५, १६, १७, १८ हे अनुक्रमे – ई, डी, पी, टी, टी असे लक्षात ठेवावे. इक्वलीटी (इ), डिस्क्रिमिनेशन (डी), पब्लिक एम्प्लॉयमेंट (पी), टचेबिलीटी (टी), टायटल (टी) असे लक्षात ठेवू शकता. परंतु खूपदा असे होते की परीक्षेसाठी हॉलमध्ये गेलात आणि प्रश्नपत्रिका हातात पडली की खूपदा मेमरी ब्लॉक होते आणि काही आठवेनासे होते. न्यूमॉनिकचा इथे खूप फायदा होतो.

इतिहास जर लक्षात ठेवायचा असेल तर स्टोरी टेलिंग पद्धतीने सराव करावा लागतो. यासाठी खरंतर रिअल टाईममध्ये सोडवलेले मॉक टेस्ट खूप उपयोगी पडतात. टेंशन घेऊन पेपर सोडवायची सवय लागली की प्रत्यक्ष हॉलमध्ये टेंशन येत नाही.

स्मरणशक्ती वाढवायला ब्राम्ही सेवन करायला हरकत नाही. रोज बदाम खाणे उपयोगी पडू शकते. शीर्षासन देखील उपयोगी पडू शकते. भानावर राहून अभ्यास केला तर तो लक्षात रहातो. मोबाईलमुळे हल्ली स्मरणक्षमता कमी होत चाललेली आहे. आमच्या लहानपणी सर्व आप्तस्वकियांचे फोन नंबर पूर्णपणे लक्षात असायचे, परंतु हल्ली स्वतःचा मोबाईल नंबरदेखील लक्षात नसतो. हे भीषण आहे. हल्ली मेमरी टेस्टींग सुद्धा होत नाही. कालाय तस्मै नमः स्वतःहून प्रयत्न केला तर मोबाईलच्या जंजाळातून सुटून स्वतःची मेमरी खूप वाढवता नक्कीच येते.


अॅड. शैलेश कुलकर्णी
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि
करिअर समुपदेशक आहेत.)