निसर्गाला ओरबाडून सण नको

प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल. यासाठी युवा पिढीची निसर्गाप्रती असलेली संवेदना जागृत करणे गरजेचे आहे. ही संवेदना युवा पिढीमध्ये रुजवणे आवश्यक आहे.

Story: साद निसर्गाची |
24th August, 12:11 am
निसर्गाला ओरबाडून सण नको

श्रावण महिन्यातील शेवटच्या रविवारी आदित्य पुजनासाठी शेरवडे हवी म्हणून पानांच्याऐवजी चक्क शेरवडांचे झाडच कापून नेणारी व्यक्ती बघितली अन् खंत वाटली. दोन‌-चार पानांसाठी चक्क संपूर्ण झाडाची कत्तल? हा अविचार कशासाठी? सण-सोहळे साजरे करण्यासाठी? शिकलेला-सवरलेला आजचा माणूस इतका अविचारी का? आपल्या भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण हा निसर्गाशी निगडित आहे. निसर्गाला भजत सण साजरे करणे हा आपल्या सनातन हिंदू संस्कृतीचा पाया आहे. मात्र हल्ली मनुष्याची अधाशी वृत्ती हा पायादेखील कमकुमत करत आहे. त्याच अनुषंगाने भाष्य करण्याचा हा प्रयत्न. 

श्रावण संपल्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येतो तो सर्वांच्या उत्साहाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने माटोळी बांधणे, मखर सजावट, सृजनशील पद्धतीने पताका लावणे, पर्यावरणपूरक रांगोळी रेखाटणे यासारख्या अनेक गोष्टी सुरु होतात. या खेरीज गावात, तालुका पातळीवर, राज्य पातळीवर वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. मात्र या स्पर्धांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा विषय लक्षात घेत पर्यावरणपूरक निकषांची पूर्तता कितपत गांभीर्याने केली जाते हा मोठा प्रश्न. माटोळी हा चतुर्थीचा सर्वात महत्त्वाचा घटक. ह्या माटोळीसाठी लोक रानावनात, गर्द घनदाट जंगलांमध्ये हिंडून वेगवेगळी फळे, फुले, वेली एकत्र करत असतात. हे सर्व करत असताना आमचे जुने जाणते लोक निसर्गाला हानी पोहचणार नाही याची पुरेपुर काळजी घ्यायचे. मात्र आता गणपतीची माटोळी आकर्षक करण्यासाठी आणि स्पर्धेमध्ये बक्षीसे पटकावण्यासाठी निसर्गातील दुर्मीळ घटक गोळा करताना खास करुन युवा वर्गाने अधिकची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

हिंदू धर्मातील सण उत्सव हे आपल्या अस्मितेचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा ठेवा आहे. सण उत्सवाच्या काळात सजावटीसाठी उपयोग करण्यात येणारा थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर पर्यावरणाला हानी पोहचवत असल्याने तो कटाक्षाने टाळला पाहिजे. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती, तसेच मोठ्या आकाराच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्यावेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते, त्यामुळे त्याचाही आज गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ध्वनिक्षेपक आणि डॉल्बीसारख्या मोठ्या आवाजातील वाद्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाने मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असतात याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.

पर्यावरणपूरक गोष्टींना महत्त्व देताना आपण कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या सुंदर मूर्तींना प्राधान्य देऊ शकतो. या मूर्ती पाण्यात अगदी सहजपणे विरघळतात. या मूर्तीना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. इकोफ्रेंडली मूर्ती तयार करताना कागद, टिश्यूपेपर, माती, वॉटरकलर, भाज्यांपासून तयार केलेले रंग, डिंकापासून बनविलेला गम, कापड इत्यादी साहित्य वापरात आणले जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण स्वतःसह लोकांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल. यासाठी युवा पिढीची निसर्गाप्रती असलेली संवेदना जागृत करणे गरजेचे आहे. ही संवेदना युवा पिढीमध्ये रुजवणे आवश्यक आहे. यासाठी शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांनी विशेष कार्यशाळा आयोजित करून तरुणांना मार्गदर्शन करावे. त्यांना पर्यावरणस्नेही वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिल्यास हा बदल अधिक वेगाने होईल. सोशल मीडियाचा वापर करून या विचारांचा प्रसार करणे ही काळाची गरज आहे.

​गणेशोत्सवासारख्या उत्सवांचा खरा उद्देश सफल करण्यासाठी पर्यापरणपूरक सण साजरे करणे ही काळाची गरज बनली आहे. वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, ग्लोबल वॉर्मिंग आदींमुळे सजीवसृष्टीपुढे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण थांबवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान आपल्यापुढे उभे आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सर्वांनीच आपला आनंद द्विगुणीत केला पाहिजे. आपल्या संस्कृतीचा आदर राखूनही आपण निसर्गाचे संरक्षण करू शकतो, हे प्रत्येक भारतीयाने लक्षात घेणे आवश्यक आहे. लहानसहान प्रयत्नांतूनही मोठा बदल घडवता येतो.


स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)