आता काहीच दिवसांत आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. आजची रेसिपी काहीशी अशीच आहे. तुम्हाला अंदाज आला असेल, हो ना? चला तर मग, आज काय रेसिपी आहे ते पाहूया.
साहित्य:
१ मोठा चमचा खसखस
१ बारीक वाटी खोबरं
१ बारीक वाटी काजू पावडर
१ ते २ मोठे चमचे तूप
१ बारीक वाटी मध्यम चिरलेले काजू
१ बारीक वाटी मध्यम चिरलेले बदाम
१ बारीक वाटी मध्यम चिरलेले पिस्ते
१ मोठी वाटी बारीक वाटलेले खजूर
१ बारीक चमचा वेलची पूड
कृती:
प्रथम एका कढईत १ मोठा चमचा खसखस घ्या आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. खसखस छान भाजली की दुसऱ्या भांड्यात काढा आणि त्याच कढईत बारीक वाटी खोबरं भाजून घ्या. खोबरं छान खमंग भाजून घ्या म्हणजे आपले मोदक छान होतील. खोबरं छान भाजले की त्यात बारीक वाटी काजू पावडर घालून १ ते २ मिनिटे परतून घ्या.
आता हे मिश्रण दुसऱ्या भांड्यात काढा आणि त्याच कढईत १ ते २ चमचे तूप घाला. तूप छान गरम झालं की त्यात १ बारीक वाटी मध्यम चिरलेले काजू, १ बारीक वाटी मध्यम चिरलेले बदाम, १ बारीक वाटी मध्यम चिरलेले पिस्ते आणि १ मोठी वाटी बारीक वाटलेले खजूर घालून खजूर मऊ होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्या. आता यात आपण मगाशी भाजून घेतलेले सर्व जिन्नस घालून छान ३ ते ४ मिनिटे परतून घ्या. आता हे मिश्रण थंड झाले की मोदकाच्या साच्यात घालून छान मोदकाचा आकार द्या.
संचिता केळकर