पुराणांमध्ये माता सीता, सखी द्रौपदी आणि माता अहिल्या यांची उदाहरणे आहेत, जिथे केवळ संशयामुळे त्यांना अतोनात दुःख सहन करावे लागले. अशीच एक कहाणी लोककथेतून समोर येते, ती म्हणजे राजकन्या जीवतेची. मागच्या भागात आपण पहिले, संशयी स्वभावाच्या पतीने पत्नी जीवताला केवळ त्याचा खेळ पाहण्यासाठी गेली म्हणून मारहाण करून आणि अपमानित करून हाकलून दिले. असहाय अवस्थेत ती आपल्या वडिलांच्या राज्यात पोहोचली आणि त्यांची ओळख न सांगता त्यांच्याच महालात दासी बनून आश्रय घेतला. दळण दळताना तिने आपल्या आई- वडिलांच्या नावाची ओवी गायली...

इकडे दासीच्या वेशात असलेली जीवता जसजशा ओव्या गाऊ लागते, तसतशी राणी आपल्या मुलीच्या आठवणीने व्याकूळ होत जाते. शेवटी ती आपल्या मुलाला, सुभानाला, हाक मारते. "बाळा सुभान, ही जी नवी दासी आहे, तिचा आवाज अगदी तुझ्या बहिणीसारखा आहे आणि आज मला तिची फार आठवण येत आहे. तेव्हा तू तिच्या सासरी जाऊन दोन दिवसांसाठी तिला इथे माहेरी घेऊन ये." आपल्या बहिणीवर जीवापाड प्रेम करणारा भाऊ क्षणाचाही विलंब न करता आपल्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी निघतो. आईने केलेले तांदळाचे लाडू आणि गुळाचे लाडू सोबत घेऊन, बागेतला वारू म्हणजेच आपला रथ घेऊन तो जीवतेच्या सासरची वाट चालू लागतो.
आरे सुभाना तू पुत्रा
जा रे जीवताक घेऊन ये
केले भुकेचे गे लाडू
केले तानेचे गे लाडू
काडलो पागेचो गे वारु
सुबान वारवार बसलो
गेलो जीवाताचे गे घरा
सुभान आपल्या रथासह जीवतेच्या सासरी पोहोचतो. सुभानची आत्या आणि जीवतेची सासू त्याला दुरूनच घरी येताना पाहते. आपल्या मुलाने आपल्या सुनेचे काय केले आहे, ही वार्ता सासूला सुभानपर्यंत पोहोचवायची नसते. सुभान तहानलेला असेल असे समजून ती पाणी-म्हणी घेऊन त्याचे स्वागत करते. "अचानक कसा काय येता झालास?" अशी विचारपूस ती त्याला करते. तेव्हा सुभान आपल्या आत्याला, म्हणजेच जीवतेच्या सासूला सांगतो की तो आपल्या बहिणीला माहेरी घेऊन जाण्यासाठी आला आहे.
मायेन दुरसून बघलो
घेतलेन डाव्या हाती म्हणी
घेतालेन उजवे हाती पाणी
बाला कसो येणे झालाय
मिया जीवताक वारक येयला
आत्या माजी जीवता भयाण खयी
पण सासूला जीवतेचे काय झाले आहे हे सांगायचे नसल्यामुळे ती सुभानची दिशाभूल करत सांगते की, "ती पाणी आणायला गेली आहे." म्हणून सुभान नदीकाठी जाऊन जीवतेचा शोध घेतो. ती तिथेही न दिसल्याने, सासू त्याला सांगते की ती शेजाऱ्यांच्या घरी गेली आहे. सुभान शेजाऱ्यांच्या घरीही जाऊन तिचा शोध घेतो. जिथे-जिथे सासू सांगते, तिथे-तिथे सुभान जाऊन आपल्या बहिणीचा शोध घेतो.
आता मात्र सुभानच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागते, तेव्हा सासू वेळ मारून नेत सांगते की, "जीवता मथुरेच्या बाजारात गेली आहे, म्हणून आजची रात्र तू इथेच थांब आणि उद्या तिला घेऊन जा."
जीवता गेला पानायाक
गेलो पानयाच्या वाटे
थूय जीवताय नाही
आत्या माजी जीवता भयाण खई
गेली माथुरे पेठीक
आयची वस्ती राव रे बाळा
उद्या घेऊन तू जा रे
गेली मथुरे पेठीक
सुभानला रात्रभर थांबायला लावून आपल्या मुलाचे पाप लपवण्यासाठी सासू स्वतः मथुरेच्या बाजारात जाते. तिथून ती गव्हाचे पीठ आणि तेल आणते. गव्हाच्या पिठापासून एक बाहुली तयार करते आणि ती बाहुली तेलात तळते. तिला भरजरी पीतांबर नेसवते आणि सर्व दागिने घालते.
हाडलेन गावाचे गे पीठ
हाडलेन दोन शेर तेल
केले पिठाचे बावले
तेका तेलात तळले
नेसयले पिवळे पितांबर
घातले सरव दागिने
जीवातक घेवून जा रे
असे जीवतेसारखे सजवलेले बाहुले अलगद सुभानच्या रथात ठेवून ती सुभानला सांगते की, "तू आता तुझ्या बहिणीला, जीवतेला, घेऊन जाऊ शकतोस. पण तिला वाटेत हाक मारू नकोस किंवा मागे वळूनही पाहू नकोस. कारण ती नुकतीच बाळंतीण झाली आहे आणि तिची तब्येत नाजूक असल्यामुळे तुझ्या आवाजाचा किंवा तुझ्या नजरेचाही तिला त्रास होऊ शकतो."
वाटे तीटेक तीकाकी हाताकू नाका
तीताके वळून बघू नाका
जीवता कवळी बाळत
बिचारा सुभान आपल्या आत्याच्या या शब्दांवर विश्वास ठेवून, बाहुलीरूपी जीवतेला अलगद आपल्या राज्यात घेऊन येतो. इकडे आई दुरूनच आपला पुत्र आपल्या मुलीला घेऊन येत असल्याचे पाहते आणि तिच्या स्वागतार्थ पंचारतीचे ताट घेऊन महालाच्या दरवाजासमोर उभी राहते.
आईन दुरसून बगीला
घेतली पंचांग आरती
आई दारार ती उभी
जीवता पुढे गे येईली
मारली बावालेक खोट
बावली जमणीर पडली
सुभान महालाच्या दरवाज्याशी रथ थांबवतो. आई आपल्या जीवतेला पंचारतीने ओवाळण्यासाठी पुढे सरसावते. सुभान आईला सांगतो की आपली जीवता नुकतीच बाळंतीण झाल्यामुळे तिला आपण अलगद आत नेले पाहिजे. "तुझ्या या दिव्यांनीसुद्धा तिला त्रास होऊ शकतो." हे बोल ऐकताच तिथेच दळण दळत बसलेल्या जीवतेला ही फसवणूक असह्य होते आणि आपले काम तसेच सोडून ती धावत बाहेर येते व रथात असलेल्या बाहुलीवर लाथ मारते. बाहुलीला लाथ मारताच ती जमिनीवर पडून तुटते.
या बाहुलीवर अशी निडरपणे लाथ मारणारी आणि आपल्या जीवतेसारखा आवाज असलेली ही मुलगी कोण हे पाहण्यासाठी जीवतेची आई तिच्या माथ्यावरचा पदर दूर करते. तेव्हा तिला समजते की आतापर्यंत आपल्याच राजवाड्यात दासी म्हणून वावरणारी असहाय, निष्पाप दासी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून नरकयातना भोगलेली माझीच लेक आहे. त्यानंतर राजा भोवऱ्याला आणि त्याच्या घरच्यांना योग्य शिक्षा देऊन आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेतो.
संशयाचे भूत एकदा डोक्यात शिरले की कसे होत्याचे नव्हते करून एका सुखी कुटुंबालाही उद्ध्वस्त करते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ही जीवतेची कहाणी. उत्सुकतेपोटी आपल्या नवऱ्याचा खेळ पाहायला जाणारी जीवता आणि अशी चारचौघात आपल्याला बघायला आली म्हणून आपल्या अर्धांगिनीचा असा छळ करणारा भवरा म्हणजे जोडीदार कसा नसावा याचे उदाहरण. तर प्रजेसाठी प्रत्यक्षात तळ्याकाठी जाऊन विचारपूस करणाऱ्या राजाला पाहून कर्तव्यदक्ष राजा कसा असावा आणि आपल्या बहिणीसाठी जीव तळमळणाऱ्या सुभान बंधूने बहिणीचा घेतलेला शोध हे बहीण भावाच्या निस्सीम नात्याचे उदाहरण. आपल्या मुलाचे पातक लपवण्यास धडपडणारी आई अशी कितीतरी नाती आजही आम्हाला समाजात आढळतात. लोकवेदातून कधीतरी चित्रित केलेले हे पात्रांमधले साम्य आजच्या २१ व्या शतकात सुद्धा आपल्याला दिसून येते.
ही लोकगीते नुसती गीते नसून त्या काळच्या समाजाचे, समाजाच्या मनोवृत्तीचे, संस्कृतीचे दर्शन आहे. नुसत्या लोकवेदाच्या अभ्यासातून इतिहासातील कितीतरी कोडी सहज उलगडत जातील यात संशय नाही. (समाप्त)
गाैतमी चाेर्लेकर गावस