आकाशवाणी कलाकार – उदय म्हांबरो

साहित्यिक, नाट्य कलाकार उदय म्हांबरो यांचं त्या काळी ऐकलेलं युववाणीचं निवेदन अजूनही कानात आहे. त्यांच्याशी ही मुलाखत.

Story: ये आकाशवाणी है |
24th August, 12:23 am
आकाशवाणी कलाकार –   उदय म्हांबरो

प्रश्न - रेडिओच्या आरंभीच्या अनुभवा संदर्भात सांगा.

आकाशवाणी पणजी सोबत माझं नातं अगदी बालपणातच जुळलं. मी पणजीत मामाकडे राहून शाळा शिकत होतो. मामा रहात होते त्याच राजांगणाच्या घरात कारवारचे पै माम रहायचे. ते आकाशवाणीवर काम करायचे. कधीकधी रविवारी आम्हां मुलांना ते आकाशवाणीवर घेवून जायचे. खळार मळार हा कार्यक्रम त्याकाळी गोव्यासह कोकण, कारवारमध्ये छोट्यांचा फार आवडीचा कार्यक्रम होता. त्यात बोबड्या बोलांनी बोलणारे हरिमाम उर्फ कृष्णा लक्ष्मण मोये तसेच ताई म्हणजे कमलादेवी राव देशपांडे मुलांचे लाडके होते. डॉ. मनोहरराय सरदेसाय यांचे हडवो ताल्ल बेबो आणि चा. फ्रा. डि. कॉस्ता यांचे कोंबलेबाबांनो साद रे घाला ही गीते घराघरातील मुलांच्या ओठांवर रुळत होती.

प्रश्न - नंतरच्या आकाशवाणी श्रवणाचे अनुभव सांगा. 

माझ्या बालपणापासून तरुणपणापर्यंत नाटक व सिनेमा व्यतिरिक्त रेडिओ हे आमच्यासाठी एकमेव मनोरंजनाचे साधन गोव्यात त्याकाळी होते. त्यावेळी आजच्या सारखे वेगवेगळे दूरदर्शन चॅनल नव्हते. युट्युब, नेटफ्लिक्स सारखे ओ टी टी सारखे प्लॅटफॉर्म असायला मुळात मोबाईल नव्हते. व्हनीबायली वासरी, मनाजोगती गीतां, फोडणी फोव, पावला-कणकणी, बल्कांवांवयल्यो गजाली, युववाणी, गुरुवारचं नाटक हे कार्यक्रम श्रोत्यांच्या आवडीचे होते. मनाजोगती गीतां आणि मनपसंत गीते कार्यक्रम चालू असताना तर आम्ही रेडिओपासून बाजूला सरकत नव्हतो. मी आकाशवाणीची नाटकाची ऑडिशन पास झाल्यामुळे मला नाटकाचेही कॉन्ट्रॅक्ट मिळायचे. इथे प्रो. प्रकाश थळी, अजित केरकर, गजानन भाटकार, कृष्णा मोये, रामचंद्र कामत, हिरवे, श्रीधर कामत बांबोळकर, दिगंबर शिंगबाळ, भरत नायक, महादेव नायक, अशोक भोंसलो, वामन राधाकृष्ण आदी नामवंत नाट्यकलाकारांशी जवळून संबंध आला.

प्रश्न - आकाशवाणीसाठी आपण सादरीकरण कधी केलं?

१९७५-७६ च्या आसपास कोंकणी कविता लिहू लागलो. १९७७ मध्ये माझे परिचित कोंकणी कवी उल्हास पै रायकर यांनी मला आकाशवाणीवर युववाणी कार्यक्रमात कविता वाचनासाठी प्रोत्साहित केले. मी कविता पोस्टाने पाठवल्यार कांही दिवसांनी मला आकाशवाणीकडून करारपत्राचा फॉर्म आला. त्यात फी रुपये तीस असे लिहिले होते. मला वाटले मी तीस रुपये आकाशवाणीला भरावे लागतील. पण मग उल्हासबाबनी मला समजावले की माझ्या कार्यक्रमाबद्दल आकाशवाणी मला तीस रुपये मानधन देणार आहे. तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. आयुष्यातील ही पहिली कमाई. 

नंतर युववाणी कोंकणी व मराठी दोन्ही कार्यक्रमांचे निवेदन मी करायचो. मला मुलाखतींवर आधारित रुपक तयार करायची कामे मिळू लागली. मी आकाशवाणीसाठी बरीच रुपके तयार केली. त्यातील दोन रुपके उल्लेखनीय होती. तुरुंग प्रशासनाकडून खास परवानगी घेवून तुरुंगातील कैद्यांच्या मुलाखतींवर आधारीत ‘तमसो मा ज्यॊतिर्गमय’ हे रुपक गाजले. स्वयंरोजगार करणार्‍या युवकांवर आधारीत ‘श्रम एव् जयते’ रुपकाला 1984 वर्षाचा राष्ट्रीय आकाशवाणी पुरस्कार लाभला. 

प्रश्न - आणखीन अनुभव - 

त्याकाळात आकाशवाणी पणजी केंद्रात पुरुषोत्तम सिंगबाळ, रमेश सखाराम बर्वे, नागेश करमली, आनंद शास्त्री यांच्या सारखे उत्तम निवेदक काम करायचे. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मला लाभले. पणजीत होणार्‍या शिमगा व कार्निवल मिरवणुकीची लायव्ह कॉमेंट्री आकाशवाणीवरुन दिली जायची. फार्मसी कॉलेजकडून निघालेली ही मिरवणूक चर्च चौकापर्यंत जायची. आकाशवाणीचे युनिट मध्यभागी म्हणजे ज्युंता हावसच्या सहाव्या माळ्यावरील गच्चीत बसून हे समालोचन करायचे. पुरुषोत्तम सिंगबाळ व रमेश बर्वे सोबत समालोचन करण्याची  मोलाची संधी मला दोनदा लाभली. तो अनुभव माझ्यासाठी विलक्षण होता. ह्याच अनुभवाच्या शिदोरीवर नंतर मी वास्को शिमगोत्सवाचे प्रत्यक्ष समालोचन करण्याची जबाबदारी पेलू शकलो.


मुकेश थळी 
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)