म्हापसा नगरपालिका, सरकारी संकुल, आस्थापने तसेच जिल्हा इस्पितळ हे म्हापसा तसेच बार्देश वासियांच्या दैनंदिन गरजेची ठिकाणं आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी लोकांना चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे.
उत्तर गोव्यातील आर्थिक राजधानी म्हणून म्हापसा शहराकडे पाहिले जाते. पोर्तुगीज राजवाटीपासून नदी प्रवाहामार्गे या शहरात गरजू वस्तू आयात व्हायच्या. त्यानंतर पोर्तुगीज सरकारने शहराच्या सकल भागात प्रशस्त असे मार्केट संकुल उभारले. हे संकुल मलेशियासारख्या काही विदेशी राष्ट्रांमधल्या बाजारपेठांसारखे आहे. सदर मार्केट प्रकल्प हे पूर्वीच्याच स्थितीमध्ये अजूनही अस्तित्वात आहेत.
प्रशस्त असलेल्या म्हापसा बाजारपेठेला सध्या एकाद्या कोंडीयुक्त गर्दीच्या ठिकाणाचे स्वरूप देण्यात आले आहे. शिवाय शहराला देखील अशी स्थिती मिळाली आहे. वाहतुक कोंडी, पार्किंग समस्या, अरूंद रस्ते, पाणी पुरवठा, महामार्ग रूंदीकरणाच्या नियोजनातील अभाव, म्हापसा नदीतील गाळ उपसा आणि पावसाळ्यात उद्भवणारी पूरस्थिती अशा अनेक समस्यांमध्ये म्हापसा शहर सध्या गुरफटले गेले आहे.
ही परिस्थिती सुधारण्यासाठी शहरातील सकल भागातील कोमुनिदादच्या शेत जमिनीवर होणारे अतिक्रमण कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. शिवाय शहराचा पार्कींग, वाहतुक कोंडी संदर्भातील नियोजनबध्द मास्टर प्लान करण्याची आवश्यकता आहे. अरूंद ठरणा-या रस्त्यांवर तोडगा म्हणून रस्त्याकडेची बांधकामे आता सरसकट मागे घेणे शक्य नाही. मात्र आवश्यक ठिकाणी रस्ता रूंदीकरणासाठी कडक पावले उचलावीच लागणार आहेत.
वाहन पार्किंगवर तोडग्यासाठी पार्किंग स्थळांची निर्मिती करावी लागणार आहे. नवीन बांधकाम प्रकल्पांना त्यांच्या सरसकट परवाने न देता अशा प्रकल्पांच्या क्षमतेपेक्षा दुप्पट पार्किंगच्या नियोजनाची अट घातली गेली पाहिजे. जेणेकरून हा प्रश्न सुटावा. कारण सद्यस्थितीत प्रत्येक घरामध्ये चारचाकींची संख्या वाढत आहे.
जगप्रसिध्द बाजारपेठेला आलेले बकाळ स्वरूप बदलण्यासाठी बाजारपेठेच्या बाहेर वेंडिंग झोनची निर्मिती करणारा प्रयोग व्हायला हवा तेव्हाच या मार्केटला पूर्वीचे दिवस येतील. हा वेंडिंग झोन झाल्यास विशेषतः विद्यमान परिस्थितीची गरज म्हणून लोकांना वाहन घेऊन सामान खरेदीचा पर्याय ठेवायला हवा. तसे झाल्यास बाजाराची उलाढाल वाढण्यास मदत होईल.
वाहतुक कोंडीला कारणीभूत ठरणार्या राष्ट्रीय महामार्गामध्ये सुधारणा आणण्याची गरज आहे. विशेषतः करासवाडा, पेडे आणि कुचेली जंक्शनचा सुधारित आराखड्यानुसार विस्तार व्हायला हवा. शहरातील गांधी चौक, हुतात्मा चौक, हळदोणा प्रासार, टॅक्सी स्थानक, कोर्ट जंक्शन, खोर्ली रस्ता, शेळपे कुचेली रस्ता, धुळेर, हाऊसिंग-मार्ना या रस्त्यांवरील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी सर्व भागधारकांना विश्वासात घेऊन समन्वयाचे प्रयत्न व्हायला हवेत.
गटार व्यवस्था आणि प्रमुख नाल्यांतील दोष शोधून त्यावर योग्य तोडगा काढण्याची गरज आहे. जेणेकरून शहरात विशेषतः बाजारपेठ, बोडगिणी परिसर, उसपकर जंक्शन, हनुमान मंदिर परिसरात यापुढे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेणारे नियोजन व्हायला हवे. शिवाय म्हापसा नदीच्या सुरळीत प्रवाहातील अडथळे दूर करणारी पावले उचलली गेली पाहिजेत.
म्हापसा नगरपालिका, सरकारी संकुल, आस्थापने तसेच जिल्हा इस्पितळ हे म्हापसा तसेच बार्देश वासियांच्या दैनंदिन गरजेची ठिकाणी आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी लोकांना चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. सरकारी सेवांचा लाभ घेणार्या लोकांची इथे होणारी हेळसांड थांबवण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा राबवण्याची गरज आहे. एकंदरीतच विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या म्हापसा शहराला नियोजनबध्द मास्टर प्लॅनचे स्वरूप यायला हवे.
उमेश झर्मेकर
(लेखक गोवन वार्ताचे उत्तर गोवा ब्युरो चीफ आहेत.)