राखी म्हणजे फक्त धागा नाही. ती आठवण आहे, नातं जपणारं बंधन आहे आणि विसरलेलं नातं परत जपण्याची शक्ती आहे. बहीण-भावाच्या नात्याचे पवित्र बंधन म्हणजे राखी.
बाबांच्या फोटोसमोर ती उभी होती. शांतपणे डोळे मिटून. पण मनात विचारांचे काहूर उठले होते. आज बाबांचा मासिक स्मृतिदिन होता. सकाळीच पुरोहितांना बोलावून तिने कोरडा शिधा दिला होता. दोन दिवसांनी असलेल्या राखी पौर्णिमेचे विचार तिच्या मनात घोळत होते. एवढी वर्षे झाली... ती एक राखी मनातच विकत घ्यायची आणि समोरच्या चंद्राला मनातलं सांगायची.
एवढ्यात, "सुलूताई मी आलोय," हे वाक्य कानी पडताच तिने मागे वळून पाहिले. रोहित हातात राख्यांनी भरलेली डबी घेऊन उभा होता.
"यंदा तरी राखी बांधणार आहेस ना तू? या बघ, गेल्या पंधरा वर्षांच्या राख्या मी जपून ठेवल्या आहेत. तू नाही बांधली तरी तुझी राखी समजून मी एक राखी विकत घ्यायचो आणि या डबीत ठेवायचो. ही बघ कशी जुनी झाली आहे. हिचा तर रंगही उडालाय." रोहित एकेक राखी काढून तिला दाखवत होता आणि ती निश्चल उभी होती.
ती पुन्हा एकदा बालपणात हरवली.
रोहित आणि सुलभा मानलेले बहीण-भाऊ. एकाच गावातले. सुलभा आणि रोहितचं नातं काही रक्ताचं नव्हतं, पण जसं अनेकदा असतं, की नात्याला रक्ताची नव्हे, तर मनाची गरज असते. तसंच त्यांचं होतं. शाळेत असताना सुलभा कायम एकटीच असायची. एकदा तिच्या पुस्तकांची पिशवी एका मोठ्या पावसात भिजली आणि पुस्तके फाटली. ते बघून सुलभाला रडू आले. तेव्हा रोहितने तिला अभ्यास लिहून घेण्यासाठी स्वतःची वही दिली.
सुलूला वाटले, मलाही भाऊ असता तर असाच मदतीला आला असता. तिने रोहितला विचारले, "माझा भाऊ होशील का?" आणि त्यानंतर दर रक्षाबंधनाला सुलभा रोहितला राखी बांधायची. रोहितही तिच्यासाठी खूप काही करायचा. तिच्या अभ्यासापासून ते प्रत्येक गोष्टीत मदत करायचा. सोबत असायचा.
सुलभाचे वडील दत्तात्रय, गावातल्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते. सुलभाची आई अनुराधा रोहितला त्यांच्या घरचा एक सदस्यच मानायची. अनेकदा आईबाबा म्हणायचे, "रोहित, हे बंध नाहीत, हे नातं आहे. मनातून बांधलेलं."
दिवसामागून दिवस गेले. अनेक वर्षे सरली. सुलभा शिक्षणासाठी शहरात गेली. रोहित इंजिनिअरिंग करून गावातच एका प्रोजेक्टवर काम करत राहिला. दत्तात्रयांना वाटायचे की सुलभाचं लग्नही चांगल्या घरात होईल आणि तिचं जीवन उजळून निघेल.
पण नियतीचे वेगळेच गणित होते. सुलभाची लहान बहीण सोनाली. दिसायला सुंदर, धीट आणि थोडीशी हट्टी. ती रोहितच्या प्रेमात पडली होती. रोहितसाठी सुलभा बहिणीसारखीच होती, पण सोनालीबद्दल मात्र त्याच्या मनात प्रेमभावना होती.
शहरात शिकायला गेलेल्या सुलूताईला यांची यत्किंचितही कल्पना नव्हती. रोहित व सोनालीने त्यांचं नातं तिच्यापासून लपवून ठेवलं होतं. जेव्हा सुलभाने हे ऐकले, तिला आधी खूप राग आला. "रोहित तर आपला मानलेला भाऊ आहे. सोनालीने असं कसं केलं?" याचा जाब विचारण्यासाठी तिने रोहितला फोन केला, "मी ऐकलं ते खरं आहे का?"
रोहितने थोडा वेळ गप्प राहून शांतपणे उत्तर दिले, "हो. मी सोनालीशी लग्न करायचं ठरवलंय." ते वाक्य ऐकून सुलभाच्या आयुष्यात काहीतरी कोसळल्यासारखं झालं. तिच्यासाठी रोहित फक्त एक मानलेला भाऊ नव्हता, तर तिच्या आईवडिलांसाठीही मुलासारखाच होता. आणि आता त्याच व्यक्तीने सोनालीशी लग्न केल्यावर हे नातं तुटल्यासारखं वाटत होतं.
दत्तात्रयांना हे कळल्यावर त्यांनी काहीही विरोध केला नाही, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये निराशा स्पष्ट दिसत होती. सुलभाला माहीत होतं की आपल्या आईवडिलांना गावात मान होता आणि तो जपण्यासाठी तिने किती तडजोडी केल्या होत्या. पण सोनाली व रोहितच्या नात्याने गावातल्या लोकांनी त्यांना मानपान देणं हळूहळू कमी केले. आयुष्यभर ज्याला मुलगा मानलं, त्यानेच असं का करावं याची खंत त्यांना पोखरत राहिली.
त्या दिवसापासून सुलभाने राखी घेणे थांबवले, पण ती रोहितच्या दीर्घायुष्यासाठी चंद्राकडे बघून प्रार्थना करायची.
वर्षे सरकत गेली. सोनाली आणि रोहितचं लग्न झालं. सुलभा तर शहरातच नोकरीला लागली. आईचं तर या धक्क्याने दोन महिन्यांत निधन झालं. सुलभाचे वडील एकटे पडले. आठ-पंधरा दिवसांनी त्यांचं फोनवर थोडंफार बोलणं व्हायचं. वडिलांच्या मनाला परत त्रास होऊ नये म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी सुलभा कधीही गावात आली नाही.
दत्तात्रय वार्धक्याच्या उंबरठ्यावर येऊन थांबले होते. आजारी पडायला लागले होते. आधीच कमकुवत झालेले शरीर आणि मनस्तापाने पोखरलेले हृदय. शेवटी एक दिवस हृदयविकाराचा झटका येऊन दत्तात्रय परलोकी निघून गेले.
अंत्यसंस्कार झाल्यावर सुलभा गावात परतली होती. सोनाली आणि रोहितही शोकाकुल अवस्थेत होते. वडिलांनी आपल्या मुलींपेक्षा रोहितला अधिक जवळ केले होते, हे गावात साऱ्यांना ठाऊक होतं.
सुलभा मात्र अंतर्मुख झाली होती. तिच्या वडिलांचं तिच्यावरचं प्रेम, रोहितसाठी असलेली भावाची माया आणि सोनालीचं त्या नात्यात झालेलं रूपांतर... हे सगळं तिच्या मनात एकदम उसळून आलं.
वडिलांच्या मृत्यूच्या बाराव्या दिवशी सर्व विधी झाल्यावर सुलभा शांतपणे फोटोकडे बघत बसली होती. तिला मागे पावलांचा आवाज ऐकू आला. वळून पाहिलं तर रोहित होता. डोळ्यांत अपराधीपणाचे भाव होते.
"सुलूताई," तो म्हणाला, त्याचा आवाज कापरा झाला होता. "तुला वडिलांच्या मृत्यूचं दुःख आहे, हे मला समजतं. पण मला खरंच माफ करशील का कधी? मी सोनालीशी लग्न केलं, कारण मी तिच्यावर प्रेम करत होतो... पण मी तुझा भाऊ होतोच. सोनालीची ताई तशीच माझीही तू ताईच."
सुलभा त्याच्याकडे शांतपणे पाहत राहिली.
"तू बहिणीशी लग्न केलंस... तिने तुला पती मानलं, मी मात्र तुला भाऊ म्हणून विसरले नाही. पण वडिलांनी जपलेलं आपलं नातं... ते मी फक्त त्यांच्या काळजीपोटी मनात जपून ठेवलं. त्यांना अजून त्रास होऊ नये म्हणून राखी पाठवली नाही. पण दरवर्षी तुझ्यासाठी प्रार्थना करायचे."
"यंदा या सगळ्या राख्या मी बांधणार आहे. आता दे ती डबी माझ्याकडे. मी यावर्षी छानशी राखी विणणार आहे. तू व सोनाली दोघंही या रक्षाबंधनाच्या दिवशी."
क्षणभर रोहितच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. सोनाली हे सर्व दूरून पाहत होती. तिनेही डोळे पुसले.
"आपण खूप काही गमावलं," सुलभा म्हणाली.
राखी पौर्णिमेच्या दिवशी गावातल्या मंदिरात जाऊन तिघांनीही प्रार्थना केली. वडिलांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमा मागितली, त्यांच्या आठवणीसाठी आणि त्यांच्या पुन्हा सुरू झालेल्या बहीण-भावाच्या नात्यासाठी.
गावकऱ्यांनी पाहिले आणि म्हणाले, "बहीण मुलगी असावी तर सुलभासारखी. एक बहीण, जिने भावासाठी अनेक वर्षे राखी हातात घेतली नाही, पण नातं मात्र मनात जपलं आणि आता वडिलांच्या निधनानंतर तिने त्या नात्याला परत जिवंत केलं."
राखी म्हणजे फक्त धागा नाही. ती आठवण आहे, नातं जपणारं बंधन आहे आणि विसरलेलं नातं परत जपण्याची शक्ती आहे. बहीण-भावाच्या नात्याचे पवित्र बंधन म्हणजे राखी.
मंजिरी वाटवे