जीवतेची कहाणी

संशयाचे भूत एकदा डोक्यात शिरले की कसे होत्याचे नव्हते करून एका सुखी कुटुंबालाही उद्ध्वस्त करते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे जीवतेची कहाणी. लोकवेदातून कधीतरी चित्रीत केलेली ही पात्रांमधले साम्य आजच्या २१व्या शतकात सुद्धा आपल्याला दिसून येते.

Story: भरजरी |
10th August, 12:23 am
जीवतेची कहाणी

अनादि काळापासून स्त्रीत्वाचे शोषण होत असल्याचे आपल्याला अनेक उदाहरणांमधून दिसून येते. राजव्यवस्था, समाजव्यवस्था नेटकी राहावी म्हणून कितीतरी स्त्रियांनी आपल्या स्वत्वाचा त्याग केल्याचे दिसते. असे असूनही, स्त्री नेहमी उपेक्षित आणि अन्यायाची बळी ठरलेली दिसते. माता सीता, सखी द्रौपदी, माता अहिल्या अशी कितीतरी उदाहरणे पुराणांतून दिसतात, जिथे नुसत्या एका शंकेने स्त्रिया अतोनात दुःखाला बळी पडल्या आहेत, पण याच स्त्रिया त्याच शक्तीने उभारी घेतानाही दिसतात. असहायतेची परिसीमा गाठल्यानंतर जी स्त्री पहिले पाऊल टाकते, ते पहिले पाऊल म्हणजे तिची उंच भरारी असते.

या अशा स्त्रिया फक्त पुराणांतच नव्हे, तर लोककथेतही दिसून येतात. अशीच एका राजकन्या जीवतेची ही कहाणी.

आत्याच्या मुलाशी लग्न झालेली जीवता आपल्या नवऱ्याचा भोवऱ्याचा खेळ पाहण्यासाठी जाते. फुलाफुलांवर उडणाऱ्या भोवऱ्याप्रमाणे तिचा नवराही चंचल असतो, पण आपल्या बायकोने मात्र चार भिंतींच्या आतच राहावे अशी त्याची इच्छा असते. अशी संकुचित वृत्ती असलेल्या पतीचा भोवऱ्याचा खेळ पाहण्यासाठी जीवता आली, हे पाहून त्याला प्रचंड राग आला आणि त्या रागाच्या भरात तो घरी आला.

भवूर खेळायासी गेलो
जीवता बघायाला गेली
 भोवूर खेळान येईलो
आई माका पाणी गे तापय
आगे जीवता माजे सुने
भोवूराक पाणी गे तापाय
ती किदया माका तपायातली
ती तापायतली गावाच्या गावाड्याक

घरी आल्यावर त्याने आपली रोजची कामे बायकोला न सांगता रागाच्या भरात तीच कामे आईला सांगितली. "मला अंघोळीला पाणी काढ," असे त्याने आईला सांगितले. तेव्हा आई मात्र जीवतेला, म्हणजेच आपल्या सुनेला, "भोवऱ्याच्या अंघोळीसाठी पाणी तापव," असे सांगते. अशावेळी संधी साधून भोवरा म्हणतो, "ती माझ्यासाठी पाणी का काढेल? हे काम तर ती तिच्या प्रियकर असलेल्या गावच्या गावड्यासाठी करणार."

भवूर खेळायासी गेलो
जीवता बघायाला गेली
आई माका जेवाण वाढ
आगे जीवता माजे सुने
भोवराक जेवान गे वाढ
ती किदया आमका वाढीन
ती वाढी गावाच्या गुरावाक

पुढे जेव्हा तो "आपल्याला जेवण वाढ," असे म्हणतो, तेव्हा सासू सुनेला, म्हणजेच जीवतेला, पुन्हा सांगते की भोवऱ्याला जेवण वाढ. तेव्हा पुन्हा भोवरा तिच्यावर संशय घेत म्हणतो, "ती मला जेवण का वाढेल? ती तर तिच्या प्रियकराला, गावच्या गुरुवाला जेवण वाढेल." अशाप्रकारे प्रत्येक वेळी भोवरा जीवतेवर संशय घेत राहतो.

याचे कारण फक्त एकच होते की, जीवता त्याचा खेळ पाहण्यासाठी गेली होती. बायको खेळ बघायला आल्यामुळे भोवऱ्याच्या मित्रांनी त्याला चिडवले होते आणि याच गोष्टीचा त्याने प्रचंड राग मनात बाळगून आता तो वारंवार जीवतेवर संशय घेत होता. पण भोवरा फक्त संशयावर थांबला नाही, तर त्याला आता जीवता नकोशी झाली होती. तिचा त्याग करायचा असे त्याने मनोमन ठरवले होते. अशावेळी आपल्या मित्रांकरवी तिला सोडून द्यायचे आणि स्वतःला तिच्या बंधनातून मुक्त करायचे असा निर्णय घेत तो जीवतेला केळीच्या बनात नेतो. तिथे जीवतेला प्रचंड मारहाण करतो. शिवाय, तो आपल्या मित्रांना, शेकऱ्या आणि भेकऱ्याला सांगतो की जीवतेला मरेस्तोवर मारा. "तिच्या शरीराची विटंबना करा आणि तिला अशी हाकलून लावा की ती पुन्हा परत येणार नाही."

गेलो केळीच्या गे बनी
येया गे शेकरा भेकरा
जीवताक मार सो घाला
जीवताक नागडी रे करा
जीवताक उघडी रे करा
जीवताक मार सो घाला
जीवताक धावनान घाला
जीवताक मार सो घातलो
जीवताक धावणान घातला

आपल्या मित्रांसारखेच निष्ठुर असलेले शेकरा आणि भेकरा जीवतेला केळीच्या बनात नेतात. तिला नागडी उघडी करतात, मारहाण करतात आणि त्या गावातून हाकलून लावतात. अशी असहाय, अंगावर कपडे नसलेली आणि मारहाणीने अर्धमेली झालेली जीवता आपली अब्रू झाकण्यासाठी करमळाच्या झाडाजवळ जाते. करमळ्याची मोठी पाने आपल्या शरीराभोवती गुंडाळते आणि चालत आपल्या वडिलांच्या राज्यात पोहोचते. तिथे जाऊन, ज्या तळ्यातून तिचे घरचे लोक पाणी पीत होते, त्याच तळ्याकाठी जाऊन ती रडत बसते.

गेली करमालाच्या बनी
काडले करमालाचे खोले
नेसली करमालाचे खोले
गेली बापायाच्या गे गावा
जाऊन बसली तळ्यावर

कालांतराने, वडिलांच्या घरातील दासी पाण्यासाठी तळ्याकाठी येतात. त्यावेळी त्या पाहतात की एक तरुण, कोवळी मुलगी तळ्याकाठी रडत बसली आहे, जिच्या अंगावर कपड्याची एक चिंधीसुद्धा नाही. अशा असहाय आणि हतबल मुलीला पाहून दासींना तिची दया येते. महालात परत येऊन त्या दासी राजाला सांगतात की, "महाराज, तुमच्या तळ्यावर एक असहाय मुलगी रडत बसली आहे, कदाचित तिला मदतीची गरज असावी."

बापायाच्यो दासी पाणीयाक गेलो
पाणी घेवाण परतोन गेलो
राजा तुमच्या तळ्यार कोण हाई 

स्वतःच्या कर्तव्याची जाण असलेला राजा या गरजू प्रजेसाठी स्वतः तळ्याच्या काठी जातो. तिथे जाऊन तो त्या मुलीची चौकशी करताना विचारतो, "तू कोण आहेस?" तेव्हा मनावर दगड ठेवून जीवता आपल्या वडिलांना सांगते की ती वाटेवरची वाटसरू आहे आणि गरीब असल्यामुळे तिची अशी दयनीय अवस्था झाली आहे. अशावेळी राजा तिला आश्रय देतो.

राजा तिला जे काम जमेल ते काम द्यावे या इच्छेने विचारतो, "तुला कोणती कामे येतात?" तेव्हा आपल्या वडिलांच्या घरी लाडाकोडात वाढलेल्या जीवतेला दळण आणि कांडण याव्यतिरिक्त दुसरी कोणतीही कामे येत नसतात.

राजा तळ्यार गे गेलो
तिया कोणाची गे कोण
मी आहे वाटेची वाटसरीन
तिया काई काम करशी
मिया दळान दाळीन
मिया कांडाप कांडीन

राजा असहाय जीवतेला आपल्या महालात घेऊन येतो. दासीकरवी तिला अंगभर कपडे देतो आणि पोटभर जेवण देतो. त्यानंतर तिच्यासमोर गव्हाची रास ठेवून दळण्याचे काम देतो.

जात्यावरचा पहिला घास घालताच जीवता आपल्या बापाच्याच नावाने गोड ओवी गाऊ लागते. आतापर्यंत या सर्व गोष्टींची जाणीव नसलेली राणी, जीवता गात असलेली ओवी ऐकून लगबगीने बाहेर येते आणि विचार करते, 'ह्या मुलीचा आवाज अगदी हुबेहूब आपल्या जीवता मुलीच्या आवाजाशी मिळताजुळता आहे.' विवाहित जीवतेच्या आठवणीने राणीचा जीव कासावीस होतो.

राजान घराशी हाडली
दिले खंडीभर गहू
जीवता दलाक लागली
गायली पायली गे ओवी
गायली बापायाच्या नावान
आई रडाक लागली
माजे जीवता सारखो गळो
माजे जीवता सारखो टाळो(क्रमश:)


गाैतमी चाेर्लेकर गावस