मानवी विष्ठा : पर्यावरण संतुलनाचा पर्याय

डेटा सेंटरमधून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या सृजनशील संकल्पना महत्त्वाच्या असल्याचे मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे. डेटा सेंटर्समधून उत्सर्जित होणारा कार्बन कमी करण्यासाठी गुगल व अमेझॉन सारख्या अनेक मोठ्या कंपन्या हरित ऊर्जा स्रोतांमध्ये गुंतवणूक करत आहेत.

Story: साद निसर्गाची |
10th August, 12:22 am
मानवी विष्ठा : पर्यावरण  संतुलनाचा पर्याय

मानवी संस्कृतींमध्ये, विष्ठेकडे (मग ती स्वतःचीच का असेना) घृणात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते. सभ्य संभाषणात मानवी विष्ठा‌ हा विषय अनेकदा अस्वीकार्य मानला जातो. विष्ठेमुळे वेगवेगळ्या प्रमाणात घृणा निर्माण होते असे आपण मानतो. यामुळे विष्ठा ही काळजीपूर्वक टाळण्याची गोष्ट असल्याचे माणूस मानतो. आरोग्यावर प्रतिकूल परिणाम, दुर्गंधी, रोगराई यामुळे असे मानणे उचितही आहे पण हीच विष्ठा हवामान बदलाचा मुकाबला करण्यास सक्षम असते असे सांगितल्यास? नवल वाटेल ना? किती घाणेरडा विषय निवडला आहे असे म्हणत कदाचित काही वाचक पुढील परिच्छेद वाचणे टाळतीलही. पण घाणेरडा वाटणारा हा विषय किती महत्त्वाचा आहे व पर्यावरणीय संतुलनात ह्या विषयाचे काय महत्त्व आहे हे वाचकांना पूर्ण लेख वाचल्यानंतर नक्कीच समजेल. 

'मायक्रोसॉफ्ट' या जगविख्यात आयटी कंपनीने हल्लीच १४ हजार कोटी रुपये खर्च करून मानवी विष्ठा खरेदी केली आहे. यासाठी बिल गेट्स यांच्या कंपनीने युनायटेड स्टेटच्या 'व्हॉल्टेड डीप' नावाच्या स्टार्टअप कंपनीसोबत करार केला आहे. मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरमुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचा समूळ नायनाट करण्यासाठी मानवी विष्ठा वापरली जाणार असल्याचे मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे. हवामान बदलासाठी कारणीभूत कार्बनसारख्या प्रदूषणकारी वायूची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हा अनोखा निर्णय घेतल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. 

व्हॉल्टेड डीप कंपनीने तंत्रज्ञानाच्या आधारे असा एक शोध लावला आहे‌ ज्याच्या आधारे मानवी विष्ठा, शेण आणि इतर गोष्टी वापरून उत्सर्जित होणारे प्रदुषणकारी वायू नष्ट करणे शक्य होईल. मायक्रोसॉफ्टने व्हॉल्टेड डीपसोबत वर्ष २०३८ पर्यंत हा करार केला आहे. मायक्रोसॉफ्ट-व्हॉल्टेड डीप यांच्या करारानुसार ही कंपनी पुढील १२ वर्षांत तब्बल ४९ लाख टन कार्बन डायऑक्साईड कायमचा नष्ट करणार आहे. मायक्रोसॉफ्टचे डेटा सेंटर्स, एआय मॉडेल, क्लाउड सर्व्हर्समधून प्रचंड प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

व्हॉल्टेड डीप ही कंपनी जैविक कचरा जमिनीत पुरुन मिथेन या विषारी वायूवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. जैविक कचरा जसे की शेण किंवा मानवी विष्ठा कुजल्यानंतर (डीकम्पोज झाल्यानंतर) मिथेन वायूचे उत्सर्जन होते. या कचऱ्यामध्ये बायोसॉलिड्स (मानवी विष्ठेचे घन स्वरूप), शेण (खत), कागदी गाळ, अन्न व शेतीतून उरलेला कचरा यांचा समावेश असतो. व्हॉल्टेड डीपद्वारे हा कचरा द्रव स्वरुपात हजारो फूट खोलवर साठवला जातो. या पद्धतीमुळे मिथेन उत्सर्जन कमी होते आणि घातक वायू हवेत मिसळत नाहीत. ग्रीन हाऊस गॅस म्हणून ओळखला जाणारा मिथेन वायू कार्बन डायऑक्साईडपेक्षा ग्लोबल वॉर्मींगसाठी ८०% टक्के जास्त कारणीभूत असतो.  

मायक्रोसॉफ्टने उचललेल्या या पावलामुळे कार्बन डायऑक्साईड जरी प्रत्यक्षात नष्ट होत नसला, तरी तेवढ्याच (त्याहुनही जास्त) प्रमाणातील विषारी वायू (मिथेन) नष्ट केला जाणार आहे. २००८ पासून ही कंपनी यावर काम करत आहे. मायक्रोसॉफ्टच्या या करारामुळे पर्यावरणातील कार्बन डायऑक्साईडचे संतुलन राखण्यास मदत होणार आहे. २०३० पर्यंत मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटर्सकडून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साईड नकारात्मक श्रेणीत नेऊन मायक्रोसॉफ्टचे कार्बन फुटप्रिंट घटवण्याचे मायक्रोसॉफ्टचे लक्ष्य आहे.

 डेटा सेंटरमधून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या सृजनशील संकल्पना महत्त्वाच्या असल्याचे मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे. डेटा सेंटर्समधून उत्सर्जित होणारा कार्बन कमी करण्यासाठी  गुगल व अमेझॉन सारख्या अनेक मोठ्या कंपन्या हरित ऊर्जा स्रोतांमध्ये गुंतवणूक करत आहेत.


स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)