स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना अनेकदा विद्यार्थी गोंधळून जातात. हा विषय सोपा वाटत असला, तरी त्यात उत्तम गुण मिळवण्यासाठी योग्य रणनीती (strategy) आणि नियमित सराव आवश्यक आहे.
'जनरल इंग्लिश' हा विषय जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये असतो. अनेकदा विद्यार्थ्यांना संभ्रम होतो की याचा अभ्यास नेमका कसा करावा? काय वाचावे आणि काय वाचू नये? हेच कळत नाही. जर आपण इतर सर्व परीक्षांचे, विशेषतः GPSC (गोवा लोकसेवा आयोग) किंवा UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) च्या मागील वर्षांचे पेपर्स पाहिले, तर असे लक्षात येईल की या परीक्षांचा एक ठराविक पॅटर्न असतो. या पॅटर्ननुसार प्रश्न कदाचित वेगवेगळे येऊ शकतात.
पॅटर्ननुसार पहिला सर्वसाधारण प्रकार म्हणजे एक उतारा दिला जातो, आणि त्यावर किमान ५-७ प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे नीट वाचन आणि आकलन करून द्यावी लागतात. हा प्रश्न पहिला कधीच सोडवायला घेऊ नये. इंग्रजी पेपरमधील इतर सर्व प्रश्न सोडवून झाल्यावरच हा प्रश्न शेवटी घ्यावा. कारण, उतारा वाचायला, समजून घ्यायला जास्त वेळ लागतो. यात कदाचित वेळ जास्त जाण्याची शक्यता असते.
दुसरा हमखास प्रकार म्हणजे समानार्थी शब्द निवडायचे असतात, ज्यांना ‘Synonyms’ म्हणतात. एका विशिष्ट वहीमध्ये असे जवळपास ५०० शब्द आणि त्यांचे अर्थ लिहून काढावेत आणि ते पाठ करावेत. मागील काही वर्षांमध्ये विचारले गेलेले शब्द सुद्धा वहीत लिहून काढावेत. 'चॅट जीपीटी' (ChatGPT) वरूनही असे अनेक शब्द उपलब्ध असतात, ते लिहून काढून त्यांच्यापुढे समानार्थी शब्द लिहावेत. त्याच प्रकारे 'Antonyms' म्हणजे विरुद्धार्थी शब्द सुद्धा लिहून काढावेत. त्यामुळे एकाच वेळी समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांचा संग्रह एकाच वहीत होतो. परंतु, ते रोज मोठ्याने वाचून तोंडपाठ करावेत. खरंतर, शब्दसंग्रह हजारो असू शकतो, पण आपण काय काय पाठ करणार? तरीसुद्धा या वहीत एक हजारपर्यंत शब्द आणि प्रतिशब्द लिहून काढावेत. हा सगळा प्रकार एक प्रकारे 'जुगार'च आहे, कारण कोणताही प्रश्न येण्याची 'गॅरंटी' नसते. पण चुकीमुळे गुण गमावण्याची भीती असते. खरं तर हे प्रश्न गुण मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे. परंतु, 'Probability' (संभाव्यता) नशिबावर अवलंबून असते.
तिसरा पॅटर्न असतो, ४ छोटी वाक्ये जोडून एक मोठे वाक्य तयार करणे. यामध्ये व्याकरणदृष्ट्या (Grammatically) योग्य वाक्य तयार करता आले पाहिजे. खूपदा गोंधळ होतो, परंतु शांतपणे विचार केला तर योग्य क्रम जुळू शकतो आणि यात हमखास गुण मिळू शकतात.
चौथा पॅटर्न असतो वाक्यातील व्याकरण (Grammatical) संबंधीची चूक ओळखणे. एका सलग वाक्यात अचानक कुठे तरी व्याकरणीय चूक असते; ती नेमकी कोणती ते ओळखावे लागते. यासाठी मुळात 'Tenses' (काळ) नीट समजून घेणे गरजेचे आहे. अनेकदा ‘can’, ‘could’, आणि क्रियापदांच्या रूपांचा घोळ केला जातो. शांतपणे वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि त्यांचे नियम समजून घेतले, तर यात हमखास गुण मिळतात. ‘a’, ‘an’, ‘the’ यातील मूलभूत नियम सुद्धा अभ्यासून घेणे आवश्यक आहे.
ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लवकर आणि माहिती आहेत, ते पहिल्यांदा पटापट सोडवून घ्यावेत. त्यामुळे उताऱ्यावरील प्रश्नांसाठी जास्त वेळ मिळतो आणि घड्याळाबरोबर स्पर्धा करावी लागत नाही. या वेळेत व्यवस्थित आणि शांतपणे उताऱ्यावरील सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर देता येतात.
इंग्रजी हा विषय फक्त परीक्षेसाठी शिकतोय, अशी भावना न ठेवता, "आपण एक छान भाषा शिकत आहोत, आपला शब्दसंग्रह वाढत आहे आणि आपल्या इंग्रजी बोलण्यात सुंदर शब्द आले, तर आपली छाप पडू शकेल," या विश्वासाने अभ्यास करावा. इंग्रजीवर प्रेम केले, तर सुंदर आणि आकर्षक इंग्रजी संभाषण करता येईल आणि याचा व्यक्तिमत्त्व विकासासाठी खूप फायदा होऊ शकतो. हा आत्मविश्वास बाळगून हा विषय हाताळा. काही काळाने आपण सुद्धा 'शशी थरूर' यांच्यासारखे बोलू शकू.
अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि
करिअर समुपदेशक आहेत.)