कोकणी भाषेबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका कौतुकास्पद !

साहित्यिकांकडून गौरव : गोव्यात रोमी-देवनागरी वादाला पूर्णविराम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd August, 12:09 am

साखळी रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह डॉ. पूर्णानंद च्यारी, दिलीप बोरकर, श्रीधर कामत बांबोळकर, दत्ताराम चिमुलकर आणि विविध भागातील कोकणीप्रेमी.

साखळी : कोकणी भाषेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत घेतलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ. पूर्णानंद च्यारी यांच्या नेतृत्वाखाली विविध कोकणी साहित्यिक, भाषा मंडळाचे पदाधिकारी आणि कोकणी सेवा केंद्राच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या भेटीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, तर साहित्यिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.
ज्येष्ठ साहित्यिक दिलीप बोरकर यांनी म्हटले की, कोकणीसाठी ठोस निर्णय आणि राज्याची भूमिका स्पष्ट करणारे मुख्यमंत्री आम्ही पहिल्यांदाच पाहिले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या धाडसाची प्रशंसा केली. अनेक वर्षांपासून रोमी आणि देवनागरी लिपीवरून वाद सुरू होता, पण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या स्पष्टीकरणामुळे या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. विठ्ठल आवंडेकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी देवनागरी लिपीत कोणताही बदल होणार नाही, असे ठामपणे सांगून हा वाद मिटवल्याबद्दल त्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कोकणी भाषेच्या आधारावरच गोवा राज्याला वेगळे अस्तित्व मिळाले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रादेशिक भाषांना बळ देण्याचे पंतप्रधानांचे उद्दिष्ट आहे. आपण मुख्यमंत्री म्हणून हा विषय विधानसभेत मांडून स्पष्ट केल्याचे समाधान आहे. तसेच, १९७२ पूर्वीच्या घरांना सनदा देण्यासारखे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवून गोवेकरांना सुरक्षित निवास देण्याचे काम सरकार करत आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी दत्ताराम चिमुलकर, दिलीप बोरकर, ज्योती कुंकळकर, मिलींद भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोव्याची स्वतंत्र ओळख टिकवण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहणार असल्याचे सांगितले आणि सर्वांनी यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
नवीन पिढीला प्रेरणा
गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि खंबीर नेतृत्वामुळे नवीन पिढीला कोकणीचे महत्त्व समजले आहे. त्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे कोकणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, एक वेगळे चैतन्य निर्माण झाले आहे.