गोव्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे २४ कोटी प्रदान

किसान सन्मान निधीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd August, 12:05 am
गोव्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे २४ कोटी प्रदान

साखळी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत आमदार प्रेमेंद्र शेठ, विजयकुमार नाटेकर, संदीप फळदेसाई व इतर.

साखळी : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे गोव्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असून, आतापर्यंत सुमारे ६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये २४ कोटी रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. साखळी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी क्रेडिट कार्ड योजना आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीवरही भर दिला.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची सोय उपलब्ध असल्याचे सांगितले. या कार्डद्वारे शेतकरी आपली शेती गहाण न ठेवता बँकांमधून एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. जर कोणतीही बँक कर्ज देण्यास नकार देत असेल, तर शेतकऱ्यांनी थेट विभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
कूळ जमिनीच्या प्रश्नामुळे १६ हजार शेतकऱ्यांपैकी १० हजार शेतकऱ्यांची किसान कार्डे रद्द झाली आहेत. पण, उर्वरित ६ हजार शेतकरी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेत आहेत. गोव्यातील तरुण पिढी कृषी क्षेत्रात येत असून, शेती बागायतीला भविष्यात चांगले दिवस नक्कीच येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, कृषी संचालक संदीप फळदेसाई, डिचोलीचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, साखळीच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते.

कृषी क्षेत्रात गोव्याची प्रगती
पूर्वी गोवा भाजीपाला शेजारील राज्यांतून विकत घेत होता, पण आता राज्यातील शेतकऱ्यांनी फलोत्पादन क्षेत्रात केलेल्या क्रांतीमुळे गोव्यातून भाजीची निर्यात बाहेरच्या राज्यांमध्ये होत आहे. ही राज्य सरकारची एक मोठी उपलब्धी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आर्थिक मदतीचा तपशील
- गोव्यातील ६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर एकूण २४ कोटी रुपये जमा.
- प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर आतापर्यंत १ लाख २० हजार रुपये जमा.
- आजच्या दिवशी गोव्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १ कोटी २० लाख रुपये जमा होणार.