भाजपच्या ‘डबल इंजिन’ सरकारचा मोठा निर्णय
पणजी : भाजपचे डबल इंजिन सरकार गेल्या काही वर्षांत राज्य सरकार लोकांच्या हिताचे निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवत आहे. सरकारी जमिनीवरील घरे नियमित करण्याच्या निर्णयामुळे गोव्यातील १ लाख घरांना फायदा होणार. या निर्णयाबाबत आम्ही सरकारचे अभिनंदन करतो, असे प्रतिपादन भाजप प्रवक्ते अॅड. यतिश नाईक यांनी केले.
शनिवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सिद्धेश नाईक, धाकू मडकईकर, वासुदेव गावकर उपस्थित होते.
अॅड. नाईक म्हणाले की, सरकारने विधानसभेत भूमहसूल दुरुस्ती विधेयक मंजूर केले आहे. यानुसार या कायद्यात कलम ३८ अ चा समावेश केला आहे. यामुळे २८ फेब्रुवारी २०१४ पूर्वीची सरकारी जमिनीवरील घरे नियमित करण्यात येणार आहेत. कमाल ४०० चौमीची घरे नियमित होणार आहेत. यामुळे लाखो गोमंतकीयांना फायदा होणार आहे. पूर्वी अशा जागेतील लोकांना शौचालय बांधण्याची देखील परवानगी मिळत नव्हती. नव्या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, अॅड. नाईक यांनी सध्याच्या विधानसभा अधिवेशनात सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतल्याचे सांगितले.
अर्ज करण्याची प्रक्रिया आणि पात्रता
- ज्या गोमंतकीयांच्या नावावर कोणतीही जमीन नाही, त्यांनाच या योजनेचा फायदा घेता येईल.
- अर्ज करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
- उप-जिल्हाधिकाऱ्यांना आलेले अर्ज सहा महिन्यांच्या आत निकाली काढणे बंधनकारक आहे.
- पात्र अर्जदारांना ‘क्लास १ ऑक्युपन्सी’ देण्यात येणार आहे.