साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

ग्रीन सेसवरून विधानसभेत गोंधळ, ग्रामसभांमध्ये मेगा प्रकल्पांना विरोध कायम

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
02nd August, 11:00 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून गोव्यातील कोळशाच्या वाहतुकीवर आकारण्यात येणाऱ्या ग्रीन सेसच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. यामुळे सभापतींनी कामकाज दहा मिनिटे स्थगित केले होते. मुलभूत सुविधांवर ताण येणार असल्याने पाच ग्रामसभांमध्ये मेगा प्रकल्पांना विरोध करण्यात आला. याशिवाय अपघात, चोरीचे प्रकार सुरूच आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार

पाच ग्रामसभांमध्ये मेगा प्रकल्पांना विरोध

वार्का, मयडे, शिवोली, वेलिंग-‌प्रियोळ आणि आसगाव येथील ग्रामसभांमध्ये मेगा प्रकल्पांचा विषय विशेष गाजला. वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करून प्रस्तावित मेगा प्रकल्पांना विरोध करण्यात आला.

पर्वरीतील महिलेची सोनसाखळी लांबविली

पार्सल डिलिव्हरी करण्याच्या बहाण्याने डिलिव्हरी बॉय म्हणून आलेल्या सराईत गुन्हेगाराने पर्वरी येथील एका महिलेची १.८ लाखाची सोनसाखळी चोरून नेली. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी आंतरराज्य सराईत गुन्हेगार किशोरभाई माच्छी ऊर्फ रणप्रिया हसमुखभाई (४४, नवसारी- गुजरात) याला अटक केली आहे.

मुलीवर हल्ला करणाऱ्या पिटबूलच्या मालकाला अटक

इंदिरानगर, चिंबल येथे एका पिटबूल कुत्र्याने शेजारच्या ९ वर्षीय मुलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी रियाझ मल्लूर या पिटबूल कुत्र्याच्या मालकाला अटक केली आहे.


चोर्ला घाट परिसरात कार उलटली

गोवा-बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरात रविवारी सकाळी अपघाताची आणखी एक घटना घडली. एका चारचाकी वाहनाचे वळणावर नियंत्रण गमावल्याने गाडी गटारात उलटली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीला धाव घेत गाडी रस्त्यावर आणली.

सोमवार

पालिका क्षेत्रातील एकाच घरातील विभक्त कुटुंबांना मिळणार स्वतंत्र घरक्रमांक

नगरपालिका वा महानगरपालिका क्षेत्रात एकाच घरात राहणाऱ्या विभक्त कुटुंबांना आता स्वतंत्र घरक्रमांक मिळण्यासह वीज आणि पाण्याची स्वतंत्र जोडणी मिळणार आहे. याविषयीचे परिपत्रक नगर विकास खात्याने जारी केले आहे.

दक्षिण गोव्यात धबधब्यांसह नैसर्गिक जलसाठ्यांवर प्रवेश बंदी

पावसाळ्यात दक्षिण गोव्यातील धबधबे, खाणींचे खंदक, नद्या, तलाव व इतर जलसाठ्याच्या ठिकाणी पर्यटक व स्थानिक वारंवार भेटी देतात. गेल्यावर्षी सांगे, मुरगाव व धारबांदोडा परिसरात बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. ही समस्या लक्षात घेऊन दक्षिणेतील नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये पोहणे, आंघोळ करणे यासाठी पुढील ६० दिवसांसाठी बंदी असेल.


बाणावलीत घरावर झाड पडल्याने नुकसान

बाणावली येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील घरावर मोठे झाड पडल्याने छपराचे आणि घरातील साहित्याचे नुकसान झाले. मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन झाड तोडून सुरक्षितपणे बाजूला केले.

मंगळवार

घरफोडीत सहभागी गॅबी फर्नांडिसला पकडण्यात यश

गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात घरफोडी प्रकरणातांत मास्टरमाईंड असलेल्या गॅबी फर्नांडिस (रा. सावर्डे) याला पकडण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे.

पेडण्यातील नानेरवाडा, नईबागमध्ये लाखोंची चोरी

नानेरवाडा व नईबाग भागात रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी तीन दुकाने फोडून आणि चार ट्रकांच्या बॅटऱ्या चोरून लाखोंचा ऐवज लंपास केला. यामध्ये किरण हळदणकर यांचे दुकान, लवू कुडव यांचे गॅरेज आणि दीपक हळदणकर, अँड्रू फर्नांडिस यांच्या ट्रकांचा समावेश आहे.

तिस्क-उसगाव मार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू

तिस्क ते उसगाव मार्गावरील या खड्ड्यात दुचाकी घसरून राजाराम तुलेकर (५२, रा. घोगळ-मडगाव) यांचा मृत्यू झाला.

बुधवार

भू नकाशा, आराखड्यातील फेरफारीच्या चौकशीनंतर कारवाई : मुख्यमंत्री

भू नकाशा, आराखड्यात झालेल्या फेरफारीची चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाईल, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. विधानसभेत महसूल खात्याच्या मागण्यांबाबत झालेल्या चर्चेनंतर ते बोलत होते.

६३ वर्षीय महिलेवर बलात्कार प्रकरणी २२ वर्षीय युवकाला शिक्षा

घटनास्थळी उशी आणि बेडशीटवर आढळलेले आरोपीचे केस आणि रक्ताचा अहवाल सकारात्मक आला आहे, असे निरीक्षण नोंदवून बार्देश तालुक्यात डिसेंबर २०१९ मध्ये एका रिसोर्ट मालकिणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी मूळ मिझोरम येथील कर्मचाऱ्याला १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १.२६ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.


दोन खांब-धारगळ येथे एसटीखाली सापडून दुचाकीस्वार ठार

धारगळ येथील दोन खांब जंक्शनजवळ राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुपारी भीषण अपघात झाला. एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील भाटीवाडा नेरुल बार्देश येथील सुदीप रवी पैकर या १८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना कोल्हापूरहून पेडणे मार्गे पणजीकडे जाणाऱ्या हिरकणी एसटी बसने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने घडली.

गुरुवार

गोवा भू-महसूल दुरूस्ती विधेयक मंजूर

मोकाशे, अल्वारा आणि सरकारी जागेत घरे असलेल्या सत्तरी, डिचोली, केपे, काणकोणमधील ९० टक्के मूळ गोमंतकीयांना घरांचे मालकी हक्क देण्यासाठीच ४०० चौरस मीटर जमीन देण्याचे विधेयक संमत केले जात आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

साळगाव-पर्रामधील अपघातात दोघांचा मृत्यू

साळगाव-पर्रा रस्त्यावरील माडानी येथे झालेल्या एका भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. ओंकार देवेंद्र कारापुरकर (२५, रा. माडेल, थिवी) आणि मोहम्मद फियाझ फराझ (२३, रा. करासवाडा, म्हापसा व मूळ उडपी, कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत.

एलएनक्यू प्रश्नांची उत्तरे न दिल्यामुळे चार पंचायत सचिवांना नोटीस

ग्रामपंचायत खात्याशी संबंधित ‘एलएनक्यू’ प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल बार्देश तालुक्यातील हळदोणा, कळंगुट, सडये-शिवोली आणि रेईश मागुश या चार पंचायत सचिवांना शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देणारी ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली होती. संबंधित सचिवांनी ४८ तासांच्या आत ‘एलएनक्यू’ प्रश्नांची उत्तरे सादर केल्याने त्यांच्यावरील तात्पुरती कारवाई टळली आहे.

शुक्रवार


कोळशावरील ग्रीन सेसविरोधात विरोधक आक्रमक

गोव्यातील कोळशाच्या वाहतुकीवर आकारण्यात येणाऱ्या ग्रीन सेसच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. ‘आमका कोळसो नाका’ अशा घोषणा देत विरोधकांनी सभापतींच्या समोरील हौद्यात धाव घेतली. परिणामी सभापतींनी कामकाज दहा मिनिटे स्थगित केले.


दोन महिन्यांत होणार डम्प खनिज मालाचा लिलाव

डम्प खनिज मालाचा लिलाव येत्या दोन महिन्यांत केला जाईल. स्थानिकांना रोजगार देण्यासह स्थानिकांचे ट्रक व मशिनरी वापरण्याची तरतूद करारात करण्यात येईल. खाण धोरणात आवश्यक ते बदल करण्याची तयारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाणमंत्री या नात्याने सभागृहात दाखवली.

शनिवार

रुमडामळ-दवर्लीच्या चार पंच सदस्यांना दिलासा

रुमडामळ- दवर्लीतील बेकायदा बांधकामप्रकरणात रुमडामळ- दवर्ली पंचायतीच्या चार पंचांना सासष्टीचे गटविकास अधिकारी आदर्श देशमुख यांनी अपात्र ठरवले होते. दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिलेली आहे.

आसगाव रस्ता रुंदीकरणावरून सरकार, डिलायला, मायकल लोबोंना उच्च न्यायालयाची नोटीस

आसगाव गावात चालू असलेल्या रस्ता रूंदीकरणाच्या कारवाईविरोधात स्थानिक रहिवाशांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना गोवास्थित मुंबई उच्च न्यायालय राज्य सरकार, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो तसेच इतरांना नोटीस बजावली आहे.

लक्षवेधी

माशेल महिला को-आॅप. क्रेडिट सोसायटीची १८.०२ कोटी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) संचालक जनिता पांडुरंग मडकईकर यांच्यासह १२ संचालकांविरोधात मेरशी येथील उत्तर गोवा सत्र न्यायालयात १,७९६ पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात सुमारे ७५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.

खोर्जुवे (बार्देश) येथील स्व. अनंत नारायण कामत यांचे बनावट मृत्यूपत्र आणि बोगस कागदपत्रे तयार करणे व वारसदारांचा विश्वासघात आणि फसवणूक करून त्यांची हजारो चौ. मी. जमीन कटकारस्थानाने हडप करणे या प्रकरणातील संशयित देविदास पणजीकर व वामन पोळे यांना म्हापसा पोलिसांनी अटक केली.

मोरजी येथील कासव संवर्धन क्षेत्राजवळ पर्यटन खात्यामार्फत सुरू असलेल्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या कामाला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. न्या. भारती डांगरे आणि निवेदिता मेहता यांच्या द्विसदस्यीय न्यायपीठाने हा आदेश दिला.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मडगाव पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. शहरात सुरू असलेल्या नाकाबंदी आणि तपासणी मोहिमेदरम्यान, मॉडिफाईड सायलेन्सर आणि नंबर प्लेट नसलेल्या पाच दुचाकींवर कारवाई करत पोलिसांनी त्या जप्त केल्या.