जामीन फेटाळल्यानंतर म्हापसा पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : खोर्जुवे (बार्देश) येथील स्व. अनंत नारायण कामत यांचे बनावट मृत्यूपत्र आणि बोगस कागदपत्रे तयार करणे व वारसदारांचा विश्वासघात आणि फसवणूक करून त्यांची हजारो चौ. मी. जमीन कटकारस्थानाने हडप करणे या प्रकरणातील संशयित देविदास पणजीकर व वामन पोळे यांना म्हापसा पोलिसांनी अटक केली. संशयितांचा जामीन अर्ज २८ जुलैला मेरशी न्यायालय संकुलातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी फेटाळला होता. पोलिसांनी ३१ जुलैला दोघाही संशयितांना अटक केली. जामीन फेटाळलेल्या इतरांचा शोध सुरू आहे.
संशयित पोळे, पणजीकर यांच्यासह सुहासिनी पडवळ, प्रकाश महांबरे, विशांत कामत (जमीन ब्रोकर, रा. मडगाव), रामजी बुद्धू गुप्ता (नोटरी, रा. वडाळा, मुंबई) व प्रदीप कुमार पाठक (वकील, रा. वडाळा) यांचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. याप्रकरणी रिचा शिरोडकर (रा. पत्रादेवी- तोरसे), शैलेश महांबरे (क्रांतीनगर- आल्तो पर्वरी), राजेश शिरोडकर, रिया शिरोडकर, रूपेश शिरोडकर, नीलेश शिरोडकर, नेहा शिरोडकर, (रा. पत्रादेवी- तोरसे), राधाकृष्ण शेटये, शुभांगी शेटये (रा. तोरसे - पेडणे), विजय मंत्री, विजया मंत्री (रा. आरवली- सिंधुदुर्ग), वामन महांबरे, स्मिता महांबरे (रा. सोनारभाट साळगाव), प्रिया पै, कृष्णा पै (रा. भोम माशेल), संध्या महांबरे, सुगंधा महांबरे (रा. क्रांतीनगर पर्वरी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
जमीन हडपचा प्रकार नोव्हेंबर २०२४ पूर्वी घडला. तक्रारदारांचे वारसदार खोर्जुवे येथील अनंत कामत यांचे मे २०२१ मध्ये, तर प्रभावती अनंत कामत यांचे जून २००९ मध्ये निधन झाले. त्यांना अपत्य नव्हते. अनंत कामत यांच्या अविवाहित भावाचेही निधन झाले. त्यांच्या तीन बहिणी विवाहित आहेत. कामत दाम्पत्याने स्थावर आणि जंगम मालमत्तेचे मृत्यूपत्र तयार केले नव्हते. वरील संशयितांनी अनंत कामत यांचे बनावट मृत्यूपत्र आणि बोगस दस्तावेज तयार करून सर्वे क्रमांक ५२/०, ५१/३, ५०/७, १००/७, १००/१, ५३/८, ५५/८, ५५/९, २८/१(पार्ट), १४०/१(पार्ट) मधील हजारो चौ.मी. जमिनीचे म्युटेशन करून ती बळकावली.
हे बनावट मृत्यूपत्र मुंबईतील नोटरी संशयित आर.बी. गुप्ता व अॅड. पी. के. पाठक यांच्या संगनमताने संशयितांनी मुंबईत तयार केल्याचे आढळून आल्याने नोटरी व वकिलाची या प्रकरणात चौकशी करावी, असे फिर्यादींनी तक्रारीत नमूद केले होते. तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी मार्च २०२५ मध्ये संशयितांविरुद्ध भा.न्या.सं.च्या ३१९(२), ३३६(३), ३३८, ३४०(२) व ३१८(४) कलमान्वये गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.