कुत्र्यांकडून चावे घेण्याच्या प्रकारामुळे नागरिक हैराण

दाेन वर्षांत शंभर टक्के वाढ : राज्यात २०२४ मध्ये १७,२३६ जणांना कुत्र्यांनी घेतले चावे


01st August, 11:58 pm
कुत्र्यांकडून चावे घेण्याच्या प्रकारामुळे नागरिक हैराण

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात कुत्र्यांकडून चावे घेण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असून २०२४ वर्षी १७,२३६ जणांना कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. या अगोदर २०२३ मध्ये कुत्र्यांनी ११,९०४ जणांना चावे घेतले. २०२२ मध्ये कुत्र्यांनी चावे घेतलेल्यांचा आकडा ८,०५७ होता. दोन वर्षांत कुत्र्यांकडून चावे घेण्याच्या प्रकारात १०० टक्के वाढ झाली आहे.
गोव्यात सुमारे ५६ हजार भटके कुत्रे असल्याचा अंदाज आहे. गोवा हे देशातील पहिले रेबीजमुक्त राज्य आहे. गेल्या पाच वर्षांत रेबीजमुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. तरीही कुत्र्यांनी चावे घेण्याचे प्रकार वाढत आहेत. भटक्या कुत्र्यांचा समुद्रकिनाऱ्यावरही उपद्रव वाढत आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी आमदारांकडून प्रत्येक अधिवेशनात झाली आहे. पर्यटन खात्याच्या मागण्यांवर चर्चा सुरू असताना आमदारांनी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा मुद्दा मांडला होता.
रॉटवायलर, पिटबुल या हिंस्र जातीच्या कुत्र्यांवर बंदी घालण्यासाठी याच अधिवेशनात गोवा प्राणी प्रजनन नियमन व नुकसानभरपाई हे विधेयक सरकारने संमत केले आहे. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर हिंस्र जातीच्या कुत्र्यांवर बंदी येणार असली तरी भटक्या कुत्र्यांची समस्या कायम राहणार आहे. हिंस्र जातीच्या कुत्र्यांसह भटक्या कुत्र्यांकडूनही चावे घेण्याच्या घटना घडलेल्या आहेत. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांची संख्या नियंत्रणात आणण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. निर्बीजीकरणाची मोहीम सुरू असली तरी तिला अपेक्षित यश आलेले नाही.
फोंड्यात दोन मुलांवर हल्ला
मंगळवारी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कुर्टी येथील पाच वर्षीय मुलगी जखमी झाली. गुरुवारी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हवेली-कुर्टी, फोंडा येथील पाच वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. लोकांनी कुत्र्यापासून सुटका केल्याने मुलाचा जीव वाचला. फोंडा उपजिल्हा इस्पितळात त्याच्यावर उपचार करण्यात आले.