पर्यटकांना वस्तू खरेदी करण्यास भाग पाडणे येणार अंगलट

गोवा पर्यटन स्थळे संरक्षण व दुरुस्ती विधेयक २०२५ मंजूर


15 hours ago
पर्यटकांना वस्तू खरेदी करण्यास भाग पाडणे येणार अंगलट

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : समुद्रकिनाऱ्यासह इतर पर्यटन स्थळांवर वस्तू खरेदी करण्यासाठी पर्यटकांना गळ घालण्यासह विविध सेवांची तिकिटे खरेदी करण्याची सक्ती केल्यास ५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत दंड होणार आहे. पूर्वी ५० हजार रुपयांपर्यंत दंड होता. गोवा पर्यटन स्थळे संरक्षण व दुरुस्ती विधेयक २०२५ सभागृहात चर्चेनंतर मंजूर झाले. आमदार कृष्णा साळकर यांनी सुचविलेली दुरुस्तीही मान्य करण्यात आली.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी हे विधेयक चर्चेसाठी मांडून संमत करून घेतले. आमदार साळकर व अॅड. कार्लुस फेरेरा यांनी दुरुस्त्या सुचविल्या. समुद्रकिनाऱ्यावर टाऊट्सकडून बेकायदा तिकीट विक्री केली जाते. लमाणी व इतर विक्रेत्यांकडून वस्तूंच्या खरेदीसाठी गळ घातली जाते. या प्रकारांसाठी आता कडक दंड होणार आहे.
उघड्यावर अन्न शिजविणे, दारू पिऊन बाटल्या फेकणे, समुद्रकिनाऱ्यावर वाहन चालविणे यासाठीही दंड होणार आहे. दंडाची रक्कम ५ हजार ते १ लाख रुपयापर्यंत करण्यासाठी कलम १०मध्ये दुरुस्ती आहे. दर दोन वर्षांनी दंडाच्या रकमेचा आढावा घेतला जाईल. दर दोन वर्षांनी दंडात १० टक्यापर्यंत वाढ होऊ शकते. यासाठी ‘कलम १० ए’चा समावेश करण्यात आला आहे.
दोन विधेयके सभागृहात सादर
कचरा उघड्यावर फेकल्यास ३ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असलेले गोवा कचरा नियंत्रण दुरुस्ती विधेयक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात सादर केले. ‘गोवा सार्वजनिक विद्यापीठ विधेयक २०२५’ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सादर केले. महाविद्यालयांचे क्लस्टर स्थापन करण्याची तरतूद विधेयकात आहे.