माशेल महिला सोसायटीत १८ काेटींच्या अफरातफरीचा आरोप
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : माशेल महिला को-आॅप. क्रेडिट सोसायटीची १८.०२ कोटी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) संचालक जनिता पांडुरंग मडकईकर यांच्यासह १२ संचालकांविरोधात मेरशी येथील उत्तर गोवा सत्र न्यायालयात १,७९६ पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात सुमारे ७५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
या प्रकरणी सहकारी तथा चौकशी अधिकारी संगीता नाईक यांनी २४ जून २०२२ रोजी ईओसीत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, माशेल महिला को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या संचालकांनी १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१९ या दहा वर्षांत १८.०२ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचे म्हटले आहे. सोसायटीच्या संचालक पद्मिनी सातोस्कर, हर्षा कुट्टीकर, दीपिका केंकरे, निलिमा नाईक, उषा तिंबले, जनिता पांडुरंग मडकईकर, सुप्रिया सावंत, संध्या सावईकर, ललिता नाईक, संध्या प्रभुगांवकर, मीना नार्वेकर आणि स्वाती पालकर या संचालकांनी षड्यंत्र रचून १८ कोटी २ लाख १७१ रुपयांची अफरातफर केल्याचे म्हटले आहे. त्यासाठी कर्ज खात्याचे पैसे भरले नाही, वैध कागदपत्रांशिवाय कर्मचाऱ्यांना अनधिकृत पैसे देण्यात आले. सावई वेरे शाखेच्या उद्घाटन वेळी अनधिकृत खर्च केले, तसेच पिग्मी डिपॉझिटची रक्कम चुकता केल्याचा दावा तक्रारीत केला आहे. ईओसीने वरील संचालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
पुरवणी आरोपपत्र दाखल करणार
अफरातफर प्रकरणी ईओसीचे निरीक्षक राजाशद शेख यांनी वरील संचालकांविरोधात मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणातील आॅडिट अहवाल प्रलंबित असल्यामुळे पुढील काळात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे ईओसीने न्यायालयाच्या नजरेस आणून दिले.