स्थानिकांना रोजगार देणे सक्तीचे : मशिनरीही स्थानिकांची वापरणे गरजेचे
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : डम्प खनिज मालाचा लिलाव येत्या दोन महिन्यांत केला जाईल. स्थानिकांना रोजगार देण्यासह स्थानिकांचे ट्रक व मशिनरी वापरण्याची तरतूद करारात करण्यात येईल. खाण धोरणात आवश्यक ते बदल करण्याची तयारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाणमंत्री या नात्याने सभागृहात दाखवली.
खनिज ब्लॉकचा लिलाव सुरू आहे. ज्यांना लिलावात ब्लॉक मिळेल, त्यांनी स्थानिक लोकांना रोजगार दिला पाहिजे. स्थानिक लोकांच्या ट्रक व मशिनरीचा वापर केला पाहिजे, अशी मागणी करणारा खासगी प्रस्ताव काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी सभागृहात मांडला. या ठरावामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्यानंतर त्यांनी प्रस्ताव मागे घेतला. या प्रस्तावावर आमदार नीलेश काब्राल, जीत आरोलकर, युरी आलेमाव यांनी मते व्यक्त केली.
राज्यात बाहेरून बरेच ट्रक येऊ लागले आहेत. खाणी सुरू झाल्यानंतर स्थानिक लोकांच्या ट्रकांना व्यवसाय मिळेल, याची काळजी घेतली पाहिजे, असे जीत आरोलकर यांनी सांगितले. युरी आलेमाव यांनी काढून टाकलेल्या कामगारांचा प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्यमंत्र्यांनी, कामगारांचा प्रश्न मला माहीत आहे आणि याविषयी बोलणी सुरू आहेत, असे स्पष्ट केले. कामगारांनाच नव्हे गोव्यातील अभियंत्यांनाही नोकरीत प्राधान्य देण्याची सक्ती केली पाहिजे, अशी मागणी नीलेश काब्राल यांनी केली.
डम्प माल खासगी, सरकारी जमिनीवर
डम्प खनिज माल खासगी आणि सरकारी जमिनीवर आहे. डम्पचा लिलाव झाल्यानंतर त्याच्या वाहतुकीसाठी स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी तरतूद केली जाईल. आता पर्यावरण दाखला मिळाल्यानंतर लीजांवर सह्या केल्या जातील. यावेळी स्थानिकांना रोजगार देण्याची अट असेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.