पाडेलींची उणीव, बागा विकल्यामुळे गोव्यात नारळाचे दर भिडले गगनाला

किरकोळ विक्रेते चिंतेत : आयात नारळावरवच व्यवसाय अवलंबून


15 hours ago
पाडेलींची उणीव, बागा विकल्यामुळे गोव्यात नारळाचे दर भिडले गगनाला

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : राज्यात नाराळाचा दर बराच वाढला आहे. हा भाव सर्वसामान्यांना परवडत नाही. पाडेलींची उणीव आणि नारळाच्या बागा कमी झाल्यामुळे गोव्यातील नारळाचे उत्पन्न कमी झाले आहे. परिणामी आयात नारळावर अवलंबून राहावे लागत असल्याने नारळाचा दर गगनाला भिडला आहे.
हल्लीच्या काळात राज्यातील सर्वच भागांत नारळाची कमतरता भासत आहे. याचा परिणाम दरवाढीत झाला आहे. घाऊक विक्रेते सरासरी आकारानुसार ३२ ते ४५ रुपये दराने नारळ विकतात. किरकोळ विक्रेत्यांकडे हाच नारळ ४० ते ८० रुपयांना विक्रीस उपलब्ध आहे. गेल्या काही महिन्यांपासून नारळ गोमंतकीयांना महागाईचे चटके देत आहे. शंभर भरतीचा नारळ ४५, १२० भरतीचा नारळ ३७ ते ४० रुपये आणि लहान आकाराचा नारळ ३२ ते ३५ रुपयांना घाऊक विक्रेते विकत आहेत. पूर्वी हाच नारळ १५ ते २० रुपयांना मिळत होता.
गोव्यात सध्या स्थानिक पाडेली मिळत नाहीत. जे मोजकेच पाडेलीचा व्यवसाय करतात, ते बहुतेक बिहारी लोक आहेत. ते एका माडावर चढायला १२० रुपयांपेक्षा अधिक मोबदला घेतात. एवढी रक्कम बऱ्याच जणांना परवडत नाही. त्यामुळे त्यांचा स्वत:पुरतेच नारळच पाडण्याकडे कल आहे. शिवाय, अनेकांनी नारळाच्या बागा विकल्या आहेत. तिथे व्यावसायिक प्रकल्प उभे राहिले असून यासाठी माड कापले गेले आहेत. त्यामुळे राज्यातील नारळाचे उपन्न घटले आहे किंवा संपत आले आहे. काहीजण पाडलेले नारळ आपल्या शेजारील लोकांना विकतात. त्यामुळे बाजारात गोमंतकिय नारळ येणे बंदच झाले आहे. तेल काढण्यासाठी नारळाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, त्यामुळे नारळ बाजारात कमी येतात आणि दर वाढतात. परिणामी केरळ, कर्नाटक व महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील आयात नारळावर घाऊक विक्रेत्यांना अवलंबून राहावे लागत आहे. आयात होणारा नारळ मुबलक नसल्यामुळे दरात वाढ झाली आहे.
गोव्यातील नारळ मिळेनासा झाला आहे. त्यामुळे व्यवसाय आयात नारळावर अवलंबून आहे. पाडेलींची कमरतता आणि नारळाची जमीन विकल्याचा परिणाम उत्पन्नाबरोबरच दरावर झाला आहे, अशी माहिती म्हापशातील घाऊक विक्रेते दिलीप यांनी दिली.


तीन वर्षात नारळ उत्पादनात ७ टक्क्यांनी घट
राज्यात २०२२-२३ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये नारळाच्या उत्पादनात ७.५४ टक्क्यांनी घट झाली आहे. आलेक्स रेजिनाल्ड यांच्या अतारांकित प्रश्नाला कृषिमंत्री रवी नाईक यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे.
राज्यात २०२२-२३ मध्ये १६.३१ कोटी नग नारळाचे उत्पादन झाले. २०२३-२४ मध्ये १६.०८ कोटी नग, तर २०२४-२५ मध्ये ते १५.०७ कोटी नग झाले. २०२२-२३ मध्ये प्रति हेक्टरी ६,११३ नग नारळाचे उत्पादन झाले. २०२३-२४ मध्ये प्रति हेक्टरी ६,००६ टन, तर २०२४-२५ मध्ये प्रति हेक्टरी ५,६२५ नग उत्पादन झाले. अनेक माड जुने झाल्याने त्यांची उत्पादकता कमी झाली आहे. कामगार नसणे व अन्य खर्च वाढल्याने नारळ शेतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. माकड, खार आदी प्राणी नारळाचे फूल तसेच अन्य भागांना इजा पोहोचवत असल्याने उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे.