आघाडी टिकविण्याचे भाजप, राजदसमोर आव्हान

Story: राज्यरंग - बिहार |
01st August, 12:25 am
आघाडी टिकविण्याचे भाजप, राजदसमोर आव्हान

विधानसभेची निवडणूक वर्षअखेरीस अपेक्षित आहे. सर्वच राजकीय पक्ष आघाड्यांची गणिते जुळवण्यात व्यग्र आहेत. सध्या मतदार याद्यांच्या तपासणीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) नेतृत्वाखालील महाआघाडी यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. नुकतेच राजदमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलेले लालूंचे थोरले चिरंजीव तेजप्रताप यादव स्वतंत्र पक्ष स्थापन करून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.

प्रत्येक निवडणुकीत जातीय समीकरणे निर्णायक ठरतात. नुकतेच जातनिहाय सर्वेक्षण झाले असल्याने नेमकी आकडेवारी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रणनीती ठरवण्यासाठी राजकीय पक्ष त्याचाच आधार घेत आहेत. राज्यात १४ टक्के असलेले यादव राजदचे समर्थक मानले जातात. खुल्या गटातील जातींचे प्रमाण १५.५२ टक्के आहे. हा रालोआचा त्यातही भाजपचा पारंपरिक मतदार समजला जातो. अर्थात सध्या कोणताच समाज पूर्णपणे एखाद्या पक्षाच्या मागे जाईल, हे अशक्यच. संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांना इतर मागासवर्गीय समुदायातील कुर्मी, कोयरी अशा छोट्या समुदायांनी साथ दिली आहे. लोकजनशक्ती पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या पक्षाने सर्व २४३ जागा लढविण्याची घोषणा करून दबाव तंत्र सुरू केले आहे. पासवान यांचा पक्ष रालोआत असतानाही त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे मागील निवडणुकीचीच पुनरावृत्ती होते की काय, यावर चर्चा सुरू आहे. मागच्या वेळी संयुक्त जनता दलाविरोधात चिराग यांनी उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यामुळे संयुक्त जनता दलाला ५० जागाही जिंकता आल्या नव्हत्या. अशावेळी भाजप नेमकी काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. माजी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विविध उपक्रमांद्वारे वातावरण ढवळून काढले. त्यांच्या जनसुराज पक्षाने स्थानिकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले.

सामाजिक समीकरणे अनुकूल ठेवण्यासाठी भाजप व राजद अधिकाधिक पक्षांना आघाड्यांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. रालोआमध्ये भाजप, संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती (रामविलास), जितनराम मांझी यांचा ‘हम’, तसेच उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोकमोर्चा हे पक्ष आहेत. मर्यादित ताकत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. रालोआसाठी जागावाटप कठीण ठरणार आहे. विरोधी महाआघाडीतही वेगळे वातावरण नाही. त्यांच्याकडे राजद, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भाकप (लेनिन), साहनी यांचा विकासशील इन्सान पक्ष, तसेच झारखंड मुक्ती मोर्चा यांचा समावेश आहे. त्यांनाही प्रत्येक पक्षाला जागा देणे आव्हानात्मक असणार आहे. 

- प्रदीप जोशी