देशाला वेध नव्या उपराष्ट्रपतींचे

भाजपच्या अध्यक्षपदाचा गुंता सोडवला गेला नसतानाच, नव्याच विषयाने भाजपला घेरले आहे. देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापतीही असतात, त्यामुळे संसदीय परंपरा आणि कामकाज यांची माहिती असलेले निष्ठावान नेते याजागी भाजप बसवेल, असा कयास आहे.

Story: विचारचक्र |
30th July, 11:07 pm
देशाला वेध नव्या उपराष्ट्रपतींचे

गेले सहा महिने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण येईल, याची चर्चा देशभरात सुरू होती. काही नावे घेतली जात होती. जे. पी.नड्डा यांचा कार्यकाल आधीच संपला असल्याने लगेच एखादा नेता या पदावर आरूढ होईल असे मानले जात होते. नेमक्या कोणत्या कारणामुळे ही निवड लांबणीवर पडत आहे, याबद्दल विविध वृत्तवाहिन्या आणि युट्युबर अंदाज व्यक्त करीत होते. माजी सचिव राम माधव यांच्या नावापासून ते महाराष्ट्राच्या विनोद तावडेपर्यंत नावे चघळली जात होती. राज्यांतील बहुतेक प्रदेशाध्यक्षांची निवड भाजपने केली असली तरी काही महत्त्वाच्या राज्यांचे भाजप अध्यक्ष ठरायचे आहेत. ही चर्चा ऐन रंगात असतानाच आणि त्यावर विश्लेषक आपली मते मांडत असतानाच, २१ जुलै रोजी घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा विषय मागे पडून नवे उपराष्ट्रपती कोण असतील, यावर सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. उपराष्ट्रपतीपद रिक्त झाले आहे, कारण जगदीप धनखड यांनी अचानक आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला आणि तो तत्काळ संमतही झाला. हे भारतातील तिसरे उपराष्ट्रपती आहेत, ज्यांनी निवृत्तीच्या आत पद सोडले. संविधानाच्या तरतुदीनुसार, उपराष्ट्रपती निवड प्रक्रिया ६० दिवसांच्या आत पूर्ण करावी लागते. लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य एकत्र मतदानासाठी सहभागी होतात. निवडणूक २८ ऑगस्ट २०२५ च्या आत पार पडावी, अशी अपेक्षा आहे. भाजपच्या अध्यक्षपदाचा गुंता सोडवला गेला नसतानाच, नव्याच विषयाने भाजपला घेरले आहे. देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापतीही असतात, त्यामुळे संसदीय परंपरा आणि कामकाज यांची माहिती असलेले निष्ठावान नेते याजागी भाजप बसवेल, असा कयास आहे. यापूर्वी सत्यपाल मलिक आणि अलीकडे जगदीप धनखड यांना भाजपने महत्त्वाची पदे देऊनही ते पक्षाच्या डोक्यावर बसण्याचा ज्यावेळी प्रयत्न करू लागले, तेव्हा त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मुरलेले नाहीत, भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी ज्यांच्या संबंध नाही, असे नेते कसे डोईजड ठरतात ते पक्षाने अनुभवले आहे. त्यामुळे ताकही फुंकून पिण्याशिवाय त्या पक्षाजवळ दुसरा पर्याय नाही. ज्येष्ठ विश्लेषक प्रभू चावला, प्रदीप सिंग, दीपक चौरसिया आदींनी राजकीय चर्चांमध्ये भाग घेत माहिती आणि अंदाज यांचा पाऊस पाडला. यामुळे प्रेक्षक तथा वाचक गोंधळून गेले आहेत. वृत्तवाहिन्यांनी चर्चेत घेतलेल्या संभाव्य नावांची माहिती केवळ अंदाज आहेत, हेही लक्षात घ्यावे लागेल.

उच्चपदस्थ राजकारण्यांचे राजीनामे अनेकदा आरोग्याच्या कारणांनी होतात. वयोमानानुसार किंवा गंभीर आजारामुळे कामकाजात अडथळा येत असल्यास हा निर्णय घेतला जाऊ शकतो. धनखड हे स्पष्टवक्ते आणि संसदेत सभापती म्हणून ठाम भूमिका घेणारे होते, असे मानले जाते. त्यामुळे सत्तारूढ पक्षाशी किंवा विरोधी पक्षांशी मतभेद वाढले असतील. पक्षांतर्गत गटबाजी, दबाव किंवा बदलत्या राजकीय समीकरणांमुळे त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव आला असण्याची शक्यता आहे. धनखड यांची कामशैली आणि काही निर्णय संसदेमध्ये वादग्रस्त ठरले होते. त्यांनी विरोधी पक्षांबद्दल कठोर पवित्रा घेतल्याबद्दल टीका झाली होती. तथापि, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्याशी झालेल्या त्यांच्या गाठीभेटी भाजपला धोकादायक वाटल्या. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रपती व पंतप्रधानांची प्रतिमा लावली जात असेल तर मग उपराष्ट्रपतीची का नको, असा प्रश्न त्यांनी मध्यंतरी उपस्थित केला होता. आपल्या पत्नीचा वाढदिवस सरकारी खर्चाने आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत साजरा केल्याबद्दल सरकार नाराज होते, असेही म्हटले जाते. सत्तांतर घडवून आणण्याचा त्यांचा इरादा होता, ज्यात त्यांना सर्वोच्च पदाची अपेक्षा होती अशी चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या मर्जीतून उतरलेले धनखड सध्या कोणत्या विजनवासात आहेत, याचा शोध प्रसार माध्यमे घेत आहेत, मात्र त्यांनी आतापर्यंत कोणतेही निवेदन न केल्याने संशयाचे वातावरण अधिक गडद  झाले आहे.

गेल्या काही दिवसांत उपराष्ट्रपती पदासाठी सर्वाधिक चर्चेत असलेल्या नावांमध्ये अरिफ महमद खान यांचे नाव आहे. ते बिहारचे राज्यपाल असून त्यांना भाजपचे समर्थक मानले जाते. त्यांच्या नावावर भाजपच्या गोटात चर्चा सुरू आहे, असे सांगितले जाते. दुसरे नाव आहे हरिवंश नारायण सिंह हे जनता दल (यू) नेत्याचे आहे, जे सध्या राज्यसभेचे उपाध्यक्ष आहेत. सध्या ते अंतरिम सभापती म्हणून कार्यरत असून एनडीए त्यांना पर्याय म्हणून पाहतात. चर्चेत असलेले दुसरे नाव रामनाथ ठाकूर यांचे असून सध्या ते कृषी राज्यमंत्री आहेत. बिहारमधील ज्येष्ठ नेते पद्मश्री स्व. कर्पुरी ठाकूर यांचे ते पुत्र आहेत. आणखी एक नाव चर्चेत आहे ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे. ते स्वेच्छेने मुख्यमंत्रिपद सोडून उपराष्ट्रपतीपद स्वीकारतील का, अशी शंका असून, ते राज्यसभा चालवू शकतील का, हा खरा प्रश्न आहे. जम्मू‑काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपत आहे. भाजपाकडून त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. राजनाथ सिंह व जे. पी. नड्डा या केंद्रीय मंत्र्यांची नावेही चर्चेत येत आहेत. राजनाथ सिंग यांचे नाव आघाडीवर असल्याचे काही राजकीय निरीक्षकांना वाटते.

अरिफ महमद खान यांचे नाव कदाचित अखेरच्या क्षणी पुढे येऊ शकते, असा अंदाज आहे. त्यांचा जन्म नोव्हेंबर १९५१ चा आहे. त्यांनी आलिगढ व लखनऊ विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांनी अनेक पक्षांत राहून काम केले आहे, काँग्रेस, जनता दल, बसप आणि नंतर भाजपमध्ये ते स्थिरावले. जवळपास सर्व पक्षांमध्ये ते सक्रिय होते. राजीव गांधी सरकारमध्ये शाहबानो प्रकरणाच्या विरोधात त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, ज्या कारणाने ते एक वेगळे नेते म्हणून उदयास आले. ते धार्मिक सुधारणा समर्थक, मुस्लिम सुधारक म्हणून ओळखले जातात. अखेर कोणाला संधी द्यायची याचा निर्णय भाजप घटक पक्ष व रा. स्व. संघाशी विचारविनिमय करून घेईल, हे मात्र निश्चित.



- गंगाराम केशव म्हांबरे

(लेखक पत्रकार असून विविध 

विषयांवर लेखन करतात)

मो. ८३९०९१७०४४