श्रीनगर : गांदरबल जिल्ह्यातील कुल्लन भागात बुधवारी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) दलाच्या जवानांना घेऊन जाणारी बस सिंध नदीत कोसळली. ही बस कुल्लन पुलावरून जात असताना अचानक नदीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ) पथकाने गांदरबल भागात बचावमोहीम सुरू केली आहे. नदीत हरवलेले जवान आणि शस्त्रास्त्रे शोधण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बसमधील काही शस्त्रास्त्रे अद्याप बेपत्ता असून आतापर्यंत तीन शस्त्रास्त्रे नदीतून मिळाली आहेत.
या दुर्घटनेत नेमके किती जवान जखमी किंवा बेपत्ता आहेत, याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. नदीपात्र अधिक खोल असल्याने बचावकार्याला अडचणी येत असल्या तरी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघाताबाबत अधिक तपशील लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.