देवघर (झारखंड) : श्रावण महिन्यात बाबा बैद्यनाथधाम यात्रेसाठी निघालेल्या कावड यात्रेकरूंवर आज मंगळवारी पहाटे मोठे संकट कोसळले. झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील मोहनपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतल्या जमुनिया फॉरेस्ट भागात गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला कावड यात्रेकरूंनी भरलेली बस जोरात धडकली. या भीषण अपघातात आतापर्यंत १८ यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात पहाटे सुमारे ४:३० च्या सुमारास झाला. बैद्यनाथधामकडे जाणाऱ्या या बसमधील अनेक जण जागीच ठार झाले, तर इतरांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुमका विभागाचे पोलीस महानिरीक्षक शैलेंद्र कुमार यांनी सुरुवातीला पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मात्र, अपघाताचा एकंदरीत परिणाम पाहता मृतांचा आकडा १८ वर पोहोचल्याचे नंतर स्पष्ट झाले. देवघरमधील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने सर्व वैद्यकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, श्रावण महोत्सवानिमित्त बैद्यनाथधाम परिसरात लाखो भाविकांची गर्दी उसळली आहे. बिहार, उत्तर प्रदेश, प. बंगाल आणि झारखंडमधून आलेल्या भाविकांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, पुढील तपास सुरू आहे.