जिज्ञासा : आज होणार 'निसार' मिशनचे प्रक्षेपण!

हवामान बदल आणि इतर घटकांच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण मोहीम

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th July, 10:17 am
जिज्ञासा : आज होणार 'निसार' मिशनचे प्रक्षेपण!

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेची नासाने संयुक्तपणे विकसित केलेल्या ‘निसार’ (NASA-ISRO Synthetic Aperture Radar) या महत्त्वाकांक्षी उपग्रहाचे प्रक्षेपण आज, ३० जुलै रोजी संध्याकाळी ५:४० वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात येणार आहे. हा उपग्रह जीएसएलव्ही-एफ१८ रॉकेटच्या साहाय्याने सूर्य-स्थिर कक्षेत स्थापन केला जाईल.

जीएसएलव्ही रॉकेटद्वारे अशा प्रकारच्या कक्षेत उपग्रह पाठवले जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे इस्रोचे प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांनी सांगितले आहे. या कक्षेमुळे उपग्रह पृथ्वीच्या ध्रुवीय भागातून जात असताना दरवेळी एकसमान प्रकाशात निरीक्षण करू शकतो.

‘निसार’ उपग्रहात दोन प्रकारचे रडार तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामध्ये नासाने विकसित केलेला एल-बँड आणि इस्रोने तयार केलेला एस-बँड या रडारचा समावेश आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने उपग्रह वृक्षसंपदा, हिमनद्या, महासागर आणि ध्रुवीय भागांतील अत्यंत सूक्ष्म हालचाली टिपू शकतो. एल-बँड अमेरिका स्थित जेट प्रोपल्शन लॅबमध्ये विकसित करण्यात आला असून, एस-बँड पेलोड इस्रोच्या अहमदाबाद प्रयोगशाळेत तयार झाला आहे. प्रक्षेपणानंतर अवघ्या १९ मिनिटांत उपग्रह निर्धारित कक्षेत पोहोचणार आहे. ५१.७ मीटर लांबीच्या या रॉकेटचा लाँच पॅड  चेन्नईपासून १३५ किलोमीटर अंतरावर आहे.

निसार उपग्रह दर १२ दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचा स्कॅन करणार असून कोणत्याही हवामानात, दिवसा किंवा रात्री उच्च-रिझोल्यूशन डेटा मिळवण्याची क्षमता या उपग्रहात आहे. वृक्षांमध्ये होणारे बदल, बर्फाच्या चादरींचे खिसकणे, भूगर्भातील हालचाली यांचे निरीक्षण करता येणार आहे. या मिशनमधून मिळणारा डेटा सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा उपयोग जगभरातील वैज्ञानिक आणि संशोधकांना करता येईल. त्यामुळे हिमालय, अंटार्क्टिका आणि इतर संवेदनशील भागांतील पर्यावरणीय बदलांचे बारकाईने निरीक्षण करता येणार आहे.

निसार मिशनचा उपयोग समुद्राच्या पातळीत होणारे बदल, चक्रीवादळांचे पूर्वानुमान, जहाजांचे निरीक्षण, मातीतील आर्द्रता आणि जलसंपत्तीचे नकाशांकन यासाठी होणार आहे. भूकंपामुळे निर्माण झालेल्या जमीन तडे किंवा बर्फाच्या पातळीत झालेल्या बदलांचे मापनही हे उपकरण करू शकेल. या उपग्रहात ‘सिंथेटिक अपर्चर रडार’ (SAR) ही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले असून १२ मीटर लांबीचा मेश रिफ्लेक्टर अँटेना रडार डेटाचे संकलन करतो. या प्रणालीला इस्रोच्या I3K बस प्रणालीशी जोडण्यात आले आहे. निसार उपग्रह एकावेळी २४२ किलोमीटर रुंदीच्या क्षेत्रफळावर निरीक्षण करू शकतो.

हेही वाचा